तळावासियांवर पाण्याचे संकट

धरणाची पाणी पातळी घटली


| तळा | वार्ताहर |

वाढत्या उष्णतेमुळे तळा शहरातील धरणाची पातळी घटली असून, धरणाचे पाणी या वर्षी लवकर खोल गेल्याने गुरांचे पिण्याचे पाणी व कपडे धुण्यासाठीच्या पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

तळा शहरातील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या धरणाचे भूमिपूजन भारताचे पहिले अर्थमंत्री डॉ. सी.डी. देशमुख यांच्या हस्ते झाले होते. या धरणामुळे तळ्याची पाणीसमस्या सुटेल या दृष्टीने हा धरण बांधण्यात आला होता. या धरणाच्या बाजूला खालच्या भागात मारलेल्या बोरअवेलच्या साह्याने कुंभार आळी, पुसाटी, इंदापूर-तळा रस्ता भागातील वसाहतीत या बोरअवेलचा पाणीपुरवठा केला जातो. एक दिवसाआड पाणी तळा शहरात पुरवठा केले जाते. मात्र, दररोज पाणीपुरवठा व्हावा, अशी अपेक्षा नागरिकांतून होत आहे. या धरणाचे पाणी यावर्षी लवकर खोलात गेल्याने गुरांचा व कपडे धुण्यासाठीच्या पाण्याची समस्या येईल, असे नागरिक व शेतकर्‍यांमधून म्हटले जात आहे. या धरणाचा गाळ काढून धरण अधिक खोल करण्याची गरज आहे. धरण अधिक खोल करून गाळ काढल्यास पाण्याचा साठा अधिक होऊन काही प्रमाणात का होईना; परंतु पाणी अधिक काळ टिकून अनेक समस्या सुटण्यास मदत होईल.

Exit mobile version