हॉटेल व्यवसायिक यांना मुबलक पाणी
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरानमध्ये मे महिन्यात हजारोच्या संख्येने पर्यटक येत असतात. पर्यटकांच्या सुविधेसाठी सध्या माथेरान शहरात नागरी वस्तीत पाणी कपात सुरु आहे. मात्र, शहरात एका बाजूला पाणी कपात आणि दुसर्या बाजूला हॉटेल व्यवसायिकांना मुबलक पाणी पुरवठा होत आसल्याचे बोलले जात आहे. मात्र, असा दुजाभाव केला जात असला तरी माथेरानमधील सर्वसामान्य जनतेचे पाण्याचे बील पूर्वी पेक्षा जास्त येत असल्याचा जाहीर आरोप सामाजिक कार्यकर्ते जनार्दन पार्टे यांनी केला आहे.
शहरात अतिथी देवोभव या उक्तीप्रमाणे प्रथम प्राधान्य पर्यटकांसाठी या न्यायाने माथेरानमधील हॉटेल्समध्ये मुबलक पाणी पुरवठा केला जातो. त्यात स्थानिक शहरवासीयांना पावसाळ्यात चार महिने मुबलक पाणी मिळत असते.त्यानंतर डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत शारलोट जवळील नैसर्गिक पाण्याचे झरे वाहत असतात. त्यामुळे शारलोट लेक या तलावाची पाण्याची पातळी डिसेंबर अखेरपर्यंत चांगल्या प्रकारे पाण्याचा साठा असतो. या पूर्वी माथेरानमध्ये दर दिवशी 8 ते 10 लाख लिटर पाणी लागत होते. परंतु, माथेरान काही स्थानिक नागरिकांनी पोटासाठी आपल्या रहात्या घराचे लॉजिंगमध्ये रूपांतर केले आहे. त्यामुळे माथेरानमध्ये सुट्टीच्या ठराविक दिवसात दर दिवशी 15 लाख लिटर पाण्याची गरज लागते. त्यामुळे माथेरान पर्यटक देखील येण्याचे प्रमाण वाढले आहे.
माथेरानमधील 50 टक्के सर्व सामान्य कुटुंबाला दर दिवशी 500 लिटर पाणी मिळाले तरी खूप झाले. परंतु, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण माथेरान शाखेचे अभियंते भोसले यांच्या कारकिर्दीत मोठ-मोठया हॉटेल व लॉजिंग वेवसायीकांना मागणी तसा पुरवठा करण्यासाठी माथेरानमधील दोन विभाग करुन आठवड्यातून सोमवार व मंगळवार पाणी पुरवठ्यात कपात करण्यात येऊन ते पाणी इतरत्र वळविण्यात येते असल्याचा आरोप माथेरानमधील सामाजिक कार्यकर्ते जनार्दन पार्टे यांनी केला आहे. माथेरानमधील पाणी पुरवठा नियोजन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून केले जाते. त्यासाठी कनिष्ठ अभियंता या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र मागील दहा वर्षात या पदावर असलेला अधिकारी माथेरानमध्ये किती दिवस आला आहे असा प्रश्न जनार्दन पार्टे यांनी केला.
माथेरान येथे दर दिवशी संपूर्ण गावात 15 लाख लिटर मुबलक पाणी लागते. त्यासाठी माथेरान शहरातील तर नेरळ येथून माथेरान करिता फक्त दोन ते तीन महिने पाणी पंपिंग करावे लागेल. परंतु, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडून नेरळ कुंभे ते जुम्मा पट्टी, ते वाटर पाईप, ते माथेरान असे एकूण तीन टप्यात पाणी पंपिग करुन माथेरानला पूरवीत आहे. त्यासाठी येणारे वीज बिल खूप जास्त येते आणि त्यामुळे माथेरानमधील सर्व नळ कनेक्शन धारकांकडून आवाच्या सव्वा वाढीव पाण्याची बिले आकारून त्याची वसुली केली जाते यास देखील सामाजिक कार्यकर्ते पार्टे यांनी आक्षेप घेतला आहे. मात्र, असे असताना देखील माथेरानमधील स्थानिक रहिवाशी हे पिण्याच्या पाण्याचे बील हे कायम वाढीव येत आहे. मात्र, माथेरान शहरातील नागरी वस्तीत दर सोमवारी आणि मंगळवारी पाणी कपात करताना पाणी पुरवठा केला जात नाही. त्यावेळी माथेरान शहरातील हॉटेल लाईन भागात कोणत्याही प्रकारची पाणी कपात नाही याबद्दल सर्व सामान्य यांच्या साठी दुजाभाव का? असा प्रश्न देखील जनार्दन पार्टे यांनी उपस्थित केला आहे.