हजारो नागरिकांना टँकरमार्फत पाणी
। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात करोडो रुपये खर्च करून जलजीवन योजना राबविण्यात आली आहे. त्यामुळे पाणी टंचाईची समस्या सुटेल, अशी आशा रायगडकरांना होती. मात्र, ही समस्या सोडविण्यास प्रशासन उदासीन ठरल्याचे चित्र समोर येत आहे. जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील रेवस परिसरात पाण्याचा दुष्काळ सुरु झाला आहे. या गावांमधील एक हजारहून अधिक नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.
दरम्यान, रायगड जिल्हा टँकरमुक्त करण्याच्या घोषणा वारंवार प्रशानामार्फत केल्या जातात. त्याचबरोबर पाणी पुरवठ्याच्या वेगवेगळ्या योजना राबवून गावे, वाड्यांमधील नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा देण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेमार्फत कायमच करण्यात आला आहे. तरी देखील रायगडकरांना पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे.
जिल्ह्यात केंद्र सरकार पुरस्कृत जलजीवन योजना राबविण्यात येत आहे. रायगड जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली असून प्रति व्यक्ती 55 लीटर प्रमाणे पाणी देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पाण्याचे स्त्रोत शोधून त्याद्वारे गावांतील नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला आहे. अनेक गावांमध्ये ही योजना राबवून विहीरी, पाणी साठवण टाकी बांधण्यात आली आहे. तरीदेखील काही गावे पाण्यापासून वंचित राहिली आहेत. सध्या उन्हाच्या झळा वाढूलागल्याने पाण्याची पातळी कमी झाल्याने धरणांतील पाण्याची पातळी कमी होत चालली आहे. त्यामुळे धरणांमधून माती मिश्रीत पाणी पुरवठा होत आहे. अनेक गावांमध्ये दोन ते तीन दिवस आड पाणी पुरवठा होत आहे. परिणामी ऐन उन्हाळी हंगामात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. ही टंचाई दुर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु केला आहे. अलिबाग तालुक्यातील रेवस गावाला एक टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यातील ज्या गावे, वाड्यांमध्ये पाणी टंचाई आहे. त्या गावात टँकरद्वारे पाणी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यात जलजीवन मिशन अतंर्गत वेगवेगळ्या योजना राबविण्यात आल्या आहेत. अनेक योजना पूर्णत्वास आहेत. काही योजनांची कामे प्रगती पथावर आहेत.
संजय वेंगुर्लेकर,
कार्यकारी अभियंता,
ग्रामीण पाणी पुरवठा, रायगड जिल्हा परिषद






