सिडको वसाहतीत पाण्याचा दुष्काळ

मागणीपेक्षा 50 टक्के पेक्षा कमी पाणीपुरवठा
कामोठे सह खारघर वसाहतीत तीव्र पाणीटंचाई

। पनवेल । वार्ताहर ।

एकविसाव्या शतकातील विकसीत शहरे अशी बिरुदावली मिरवून सिडकोने नागरी वसाहती विकसित केल्या. त्याठिकाणी सदनिका रहिवाशांच्या तर भूखंड बिल्डरांच्या माथी मारले. परंतु कोणतेही नियोजन नसल्याने आज वसाहतींमध्ये तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. खारघर आणि कामोठे येथे अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. नवीन पनवेल आणि खांदा वसाहत पाण्यासाठी वणवण सुरू आहे. एकंदरीतच ही परिस्थिती अशीच राहिल्यास उन्हाळ्यामध्ये पाणी आणीबाणी निर्माण होणार आहे.
सिडको अखत्यारी नवीन पनवेल ,कळंबोली कामोठे, खारघर, तळोजा, नावडे हे नोड आहेत. आपण नोडल एजन्सी म्हणून या वसाहतींचा विकास केला. परंतु ते करत असताना या भागातील पाणी प्रश्‍नांबाबत नियोजन करण्यात आलेले नाही. एकविसाव्या शतकातील विकसित शहर अशी बिरुदावली सिडको मिरवतो. मात्र प्रत्यक्षात मूलभूत सुविधा सुद्धा रहिवाशांना देता आलेल्या नाहीत. या सर्व वसाहतींमध्ये पाण्याचा प्रश्‍न अत्यंत गंभीर झालेला आहे. एकूण मागणीच्या तुलनेमध्ये अत्यंत कमी पाणी मिळत आहे. त्यामुळे भर पावसातही नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
नवीन पनवेलमध्ये अत्यंत बिकट स्थिती आहे. खांदा वसाहतीत तर अल्प उत्पादन गटातील नागरिकांना पाणीच मिळत नाही अशी ओरड आहे. कामोठे वसाहतीत पाण्याचा प्रश्‍न मोठा आहे. नवी मुंबई महापालिकेचे मोरबे धरण पूर्णपणे भरले असतानाही. कामोठे वसाहतीला मागणीप्रमाणे पाणी का मिळत नाही हा आमचा सवाल आहे. खारघर वसाहतीत ही परिस्थिती फारशी चांगली नाही. टोलेजंग इमारती प्रशस्त रस्ते उभारण्यात आले असले तरी, प्रत्यक्ष जीवन म्हणून समजले जाणारे पाणी नागरिकांना मिळत नाही. इतकी विदारक अवस्था सायबर सिटीची झालेले आहे. सिडको अधिकारी फक्त रहिवाशांच्या रोषाला अत्यंत शांतणे सामोरे जात आहेत. मात्र याबाबत कोणतेही हालचाली होताना दिसत नाहीत.

Exit mobile version