परिसरात दुर्गंधी, अपघाताची शक्यता
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन शहरातील जीवनाबंदर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मच्छिमारी बोटी मच्छी घेऊन येत असतात. सदरची मच्छी आणल्यानंतर ती बाहेरगावी पाठवण्यासाठी मच्छी वाहून नेणाऱ्या वाहनांचा उपयोग केला जातो. यामध्ये पिकअप, ट्रक, टेम्पो यांचा समावेश असतो. परंतु, या वाहनांमधून मच्छीचे पाणी रस्त्यावर सांडत असल्यामुळे दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, मच्छी वाहून नेणाऱ्या गाड्यांमधील पाणी हे अत्यंत बुळगबुळीत असते. त्यावरून गाड्यांचे टायर लवकर सरकतात. श्रीवर्धन शहरातून अशाप्रकारे मच्छी वाहून नेणाऱ्या वाहनांची वर्दळ दिवस-रात्र सुरू असते.
अनेक वेळा या वाहनांमधून पाणी सांडत असते. त्यामुळे रस्त्यावरदेखील मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरलेली पाहायला मिळते. मच्छीचे पाणी रस्त्यावर सांडू नये यासाठी गाड्यांना टाक्या बसविलेल्या असतात. परंतु, त्यामध्ये पाणी न सोडता हे पाणी रस्त्यावर सोडण्याचे प्रताप सदरचे गाडी चालक करत असल्याने शहरामध्ये विनाकारण दुर्गंधी पसरत आहे. तरी श्रीवर्धन पोलिसांनी मच्छीचे पाणी सांडवत जाणाऱ्या वाहनांवरती गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांमधून करण्यात येत आहे.







