नळपाणी योजनेचे पाणी तळाशी

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातील ओलमण ग्रामपंचायतमधील बोरगाव नळपाणी योजनेचे उद्घाटन दोन महिन्यांपूर्वी झाले आहे. दोन महिने भरघोस पाणी पुरवठा करणार्‍या नळपाणी योजनेची उद्भव विहिरीने तळ गाठला आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी सर्व ग्रामस्थांना मिळावे यासाठी दर दिवसाआड पाणी पुरविण्याचे नियोजन ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे. दरम्यान, उद्भव विहिरीमध्ये मुबलक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी तेथील नदीमध्ये साठवण बंधारा बांधला असून त्याची उंची वाढविण्याची किंवा नवीन साठवण बंधारा बांधण्याची आवश्यकता अशोक पाटील यांनी बोलून दाखवली आहे.

हर घर जल देण्यासाठी जलजीवन मिशनमधून ओलमण ग्रामपंचायतमधील बोरगाव, उंबरखांड आणि भवानी पाडा या भागासाठी नळपाणी योजना राबविण्यात आली. केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीमधून राबविण्यात आलेल्या या नळपाणी योजनेचे उद्घाटन मार्चमध्ये झाले होते. बोरगाव येथील पोश्री नदीच्या तीरावर उद्भव विहीर बांधून तेथे गोळा होणारे पाणी बोरगाव आणि उंबरखांड येथील जलकुंभमध्ये सोडण्यात येते. त्यानंतर घरोघरी असलेल्या नळाला सोडले जाते. योजनेचे उद्घाटन झाले त्यानंतर दोन महिने ग्रामस्थांना नळपाणी योजनेचे मुबलक पाणी मिळाले. मात्र, आता पोश्री नदी कोरडी झाली असून त्या कोरड्या झालेल्या नदीवर उद्भव असलेली विहिरीने देखील तळ गाठला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. मात्र, बोरगावमध्ये काही ग्रामस्थांकडून खासगी बोअरवेल आहेत आणि त्यामुळे गावात तीव्र पाणीटंचाई जाणवत नाही. परंतु, उंबरखांडजवळ असलेल्या भवानी पाडा येथे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे

Exit mobile version