रसायनी पोलीस ठाण्यात पाणी

| रसायनी | वार्ताहर |

गेल्या दोन दिवसांपासून पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातल्याने सर्वत्र पाणीच पाणी पहावयास मिळत आहे. यातच पाताळगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, परिसरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. यामुळे रसायनीकरांची तारांबळ उडाली आहे. यातच आपटा, कांबे तसेच परिसरातील काही सखल भागात पाणी साचले आहे. शिवाय, पुढील काही तास हवामान खात्याने पावसाचा अधिक जोर असल्याची शक्यता वर्तवली आहे. बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर अधिक वाढल्याने परिसरात पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

दरम्यान, बुधवारी रात्रीपासून रसायनी पोलीस ठाण्याच्या आवारात पाणी शिरल्याने पोलिसांची धावपळ झाली. काही तासातच रसायनी पोलीस ठाण्याचा सर्व भागात पाणी शिरल्याने साडेतीन ते चार फूट पाणी बुधवारी सकाळी 7.30 वाजता दिसून आले. यात पोलिस ठाण्यातील फर्निचर, लॅपटॉप व इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावेळी रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ बाळवडकर यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी महत्त्वाचे साहित्य बाजूला करण्यासाठी प्रयत्न केले. परंतु, पोलीस ठाण्याच्या भागात पाण्याची पातळी अधिक असल्याने बऱ्याच साहित्याचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले.

Exit mobile version