| महाड | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहुचर्चित कशेडी बोगद्यातील पाण्याचा पाझर आणि गळती अद्यापही थांबलेली नाही. राष्ट्रीय महामार्ग विभागाने केलेले सर्व तांत्रिक उपाय निष्फळ ठरले असून, दोन्ही बोगद्यांमध्ये पाण्याची गळती सुरूच आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात कोकणात ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांना आणि वाहनचालकांना मोठ्या कसरतीचा सामना करावा लागणार आहे.
गणेशोत्सवासाठी दरवर्षी मुंबई, ठाणे आणि पालघर भागातून लाखो चाकरमानी कोकणात येतात. या काळात वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून प्रशासन प्रयत्न करत असले, तरी कशेडी बोगद्यातील गळतीमुळे चिंतेचे वातावरण आहे. पावसाळ्यात बोगद्याच्या छतावरून आणि भिंतींवरून पाण्याचे फवारे उडत असून, रस्ता प्रचंड निसरडा झाला आहे. पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहने घसरून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता महामार्ग विभागाने यावर तातडीने कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी जोरदार मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून काही महिन्यांपूर्वी गळती रोखण्यासाठी केलेले प्रयत्न अपुरे ठरले असून, या प्रश्नावर गांभीर्याने तोडगा काढणे आवश्यक आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातील पाणीगळती रोखण्यासाठी आणि सुरक्षेच्यादृष्टीने राष्ट्रीय महामार्ग विभाग व कंत्राटदार कंपनीने ‘आयआयटी’च्या तज्ज्ञांमार्फत सर्वेक्षण केले आहे. खडकांतील भेगा बुजवण्यासाठी उच्चदाबाने केमिकल व सिमेंटचे ग्राउटिंग करण्यात आले. तसेच छतातून गळणारे पाणी मुख्य ड्रेनेज लाईनमध्ये सोडण्यासाठी पन्हाळी बसवण्यात आल्या आहेत. अंतर्गत भागात शॉटक्रिट, पीव्हीसी मेम्ब्रेन आणि फायबर शीटचे अस्तर लावून वॉटरप्रूफिंगचे कामही करण्यात आले. मात्र, तरीही गळती रोखण्यात यश आलेले नाही.
कशेडी बोगद्यातील पाणीगळती धोकादायक
