जूनअखेरपर्यंत पाणीपुरवठा करण्याचा एमआयडीसीचा प्रयत्न
| उरण | वार्ताहर |
एप्रिलमधील वाढत्या तापमानामुळे येथील रानसई धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागला आहे. त्यामुळे धरणात जूनअखेरपर्यंत पुरवठा करण्याचा प्रयत्न एमआयडीसीकडून नियोजन करून केला जात आहे. मात्र, ही स्थिती कायम ठेवण्यासाठी नागरिकांनीही या काळात जपून पाण्याचा वापर करावा, असे आवाहन एमआयडीसीकडून करण्यात आले आहे.
गेली अनेक वर्षे रानसई धरणातील पाणी साठवणूक क्षमता वाढत नसल्याने उरणच्या नागरिकांवर पाणीकपातीचे संकट वाढू लागले आहे. रानसई धरणाची पाणी साठवणूक क्षमता कमी झाल्याने या धरणातून पावसाळ्यातील साडेतीन महिन्याचे लाखो लीटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे येथील नागरिकांना ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यापासूनच पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी एमआयडीसीने तयार केलेला प्रस्ताव अनेकवर्षे धूळखात बसला आहे. ही स्थिती बदलून उरणला पाणीदार करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
उरण तालुक्यातील नागरिकांना व येथील उद्याोगासाठी लागणारे पाणी एमआयडीसीच्या रानसई धरणातून पुरविले जात असून उरणकराना दररोज 41 दश लक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, एमआयडीसीकडे केवळ 30 दश लक्ष लिटर पाणीच असल्याने दररोज 10 दश लक्ष लिटर पाणी कमी पडत असल्याने हा पाणी पुरवठा जून महिन्यापर्यंत पाणी पुरवठा करता यावा यासाठी पाणी कपात केली जात आहे. 1960 च्या दरम्यान उरणमध्ये संरक्षण विभागाच्या शस्त्रागारासाठी उरणच्या पूर्व विभागातील दिघोडे परिसरात रानसई धरणाची उभारणी करण्यात आली. याच धरणातून येथील ग्रामपंचायतींनाही पाणी पुरवठा करण्यात येऊ लागला. मात्र, हे धरण प्रामुख्याने औद्याोगिक विभागाला लागणारं पाणी पुरविण्यासाठी तयार करण्यात आले. त्यानुसार शास्त्रागारानंतर आलेल्या ओएनजीसीचा तेल शुद्धधिकरण प्रकल्प, वीज निर्मितीचा वायू विद्युात केंद्र तसेच भारत पेट्रोलियमचा घरगुती सिलेंडर भरणा प्रकल्प या औद्याोगिक प्रकल्पासाठी त्याचप्रमाणे उरण शहर व नगरपालिका यांनाही पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी रानसई धरणावरच येऊन पडली.
पाण्याच्या मागणीत वाढ, तर साठवणूक क्षमतेत घट
गेल्या 60 वर्षात धरणातील पाण्याची मागणी वाढली असली तरी रानसई धरणातील पाणीसाठा कमी कमी होत गेला. साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी धरणाची उंची वाढवावी किंवा धरणातील गाळ काढावा या दोन उपाययोजनांची चर्चा गेल्या पंचवीस वर्षापासून केली जात आहे.
रानसई धरणातील पाणीसाठा 97.11 फुटावर आहे. नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी नियोजन केले आहे. त्यानुसार 30 जूनपर्यंत पाणी पुरवठा करता येणार आहे. मात्र, या कालावधीत नागरिकांनी सहकार्य करून पाणी जपून वापरावे.
– ज्ञानदेव सोनवणे, उपअभियंता, उरण एमआयडीसी