रानसई धरणाच्या पाणीपातळीत वाढ

दोन दिवसांची पाणीकपात होणार रद्द; पाणीसाठा वाढल्याने उरणकरांना दिलासा

| उरण | प्रतिनिधी |

मागील काही दिवसांपासून उरण तालुक्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे उरण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणाच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. धरण परिसरात 65 मिमी पावसाची नोंद झाल्याने पाणीपातळी 103 फुटापर्यंत वाढली आहे. त्यामुळे दोन दिवस असणारी पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाकडून घेण्यात आला आहे.

उरण शहर, 21 ग्रामपंचायती आणि काही प्रकल्पांना रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, मेमध्ये रानसई धरण क्षेत्राची पाणीपातळी कमालीची खालावली होती. त्यामुळे एमआयडीसीकडून दोन दिवस पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला होता. याबद्दल उरणवासीयांकडून रोष व्यक्त केला जात होता. त्यामुळे धरणातील गाळ काढून त्याची पाणी क्षमता वाढविण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. दरम्यान, मेमध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. या वेळी तालुक्यात चांगला पाऊस झाला. त्यानंतर पावसाने उघडीप घेतली. मात्र, पुन्हा दोन दिवसांपासून पावसाने चांगली हजेरी लावल्याने धरणाच्या पाणीपातळीत चांगली वाढ झाली आहे.

मागील दोन दिवसांत धरण क्षेत्रात 65 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी अगदी 103 फुटापर्यंत पोहोचली आहे. धरणाची उंची ही 116 फुटांपर्यंत आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस असाच मुसळधार पाऊस पडत राहिला तर धरण लवकरच ओव्हरफ्लो होईल, अशी माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे उरणकरांवरील पाणीसंकट दूर होण्यास मदत होणार आहे.

उरण तालुक्यासह येथील मोठ्या प्रकल्पांना पाणीपुरवठा करण्यासाठी 1970च्या दशकात रानसई धरण बांधण्यात आले होते. रानसईच्या निसर्गरम्य अशा डोंगर कपारीत हे धरण बांधले आहे. सुमारे 6.8 चौरस किलोमीटर क्षेत्रात हे धरण आहे. या धरणात दहा मिलियन क्युबिक मीटर पाणी साठविण्याची क्षमता होती; मात्र आता सात मिलियन क्यूबिक मीटर पाणी साठवण्याची क्षमता आहे.उरणकरांना पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दररोज हेटवणे पाणीपुरवठा योजनेतून चार एमएलडी पाणी घ्यावे लागत आहे. उरणच्या वाढत्या औद्योगिकीकरणासाठी रानसई धरणाची उंची वाढविणे गरजेचे असणार आहे.

रानसई धारणाची पाणीपातळी 103 फुटांवर गेली आहे. त्यामुळे आम्ही दोन दिवसांची पाणीकपात बंद केली आहे.

जी. एम. सोनावणे,
उपअभियंता, एमआयडीसी.

Exit mobile version