| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धनमधील जीवनाबंदर या ठिकाणी नवीन जेट्टीचे काम सुरू आहे. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात भराव करून जेट्टी बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्याचप्रमाणे श्रीवर्धन दांडे परिसरात देखील नवीन जेट्टी विकसित करण्यात येत आहे. या जेट्टीकडे जाणाऱ्या मार्गासाठी दगडांचा मोठ्या प्रमाणात भराव करून खाडीचे तोंडच जवळजवळ बंद झाल्याने, श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावरील पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. पाण्याची पातळी वाढल्यामुळे श्रीवर्धन समुद्रकिनारी ओहोटीच्या वेळेस सुद्धा पाणी मागे जात नसल्याने येणाऱ्या पर्यटकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.
शासनाने विकास कामे जरूर करावीत, परंतु, विकास कामे करत असताना त्यांचा योग्य अभ्यास होणे देखील गरजेचे आहे. विकास कामे करताना जर का श्रीवर्धन किनारपट्टीवरील पर्यटनच नष्ट होणार असेल तर श्रीवर्धन येथील पर्यटकांचा ओघ कमी झाल्याशिवाय राहणार नाही, अशी शंका नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. सायंकाळच्या वेळेस समुद्राला भरती असताना खाडी जवळ फेरफटका मारला असता खाडीमधील अनेक भूभागात वाळू दिसत होती. पर्यायाने खाडीमध्ये भरतीचे पाणी जात नसल्यामुळे श्रीवर्धन किनारपट्टीवर पाण्याची पातळी वाढली आहे.







