ग्रामीण रायगडात जलजीवन मिशन प्रभावी

जिल्ह्यात 492 गावांमध्ये 100 टक्के नळ कनेक्शन
। अलिबाग । भारत रांजणकर।
प्रत्येक घरात नळाने पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाने जलजीवन मिशन हाती घेतले आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात जलजीवन मिशनची प्रभावी अंमलबावणी करण्यात येत असून, रायगड जिल्ह्यातील 492 महसुली गावांमधील 100 टक्के घरांना नळ कनेक्शन देण्यात आले आहे. त्यामुळे ही गावे हर घर जल गाव म्हणून घोषित करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे उरण तालुक्यातील 100 टक्के म्हणजे 54 गावांमधील सर्व घरांना नळ कनेक्शन देण्यात आले आहे. केंद्र सरकारने जलजीवन मिशन हाती घेतले आहे. या अंतर्गत 2024 पर्यंत प्रत्येक घरात नळाने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. या योजनेच्या माध्यमातून सुरुवातीला ज्या घरांमध्ये नळ कनेक्शन आहे, त्या घरांची माहिती संकलित करण्यात आली. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यात ज्या घरांमध्ये वैयक्तिक नळ कनेक्शन नाही अशा घरांना नळ कनेक्शन देण्यात येत आहे. जिल्ह्यात जलजीवन मिशन यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, उपाध्यक्ष सुधाकर घारे, विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांच्यासह सर्व जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी, कर्मचारी यांचे सहकार्य लाभत आहे. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.पी. वेंगुर्लेकर, पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचारी योग्य नियोजन करून योजना प्रभावीपणे राबवित आहेत.


तालुका : 100 टक्के नळ कनेक्शन असलेली गावे
अलिबाग : 42
कर्जत : 24
खालापूर : 40
महाड : 44
म्हसळा : 50
मुरुड : 14
पनवेल : 69
पेण : 17
पोलादपूर : 10
सुधागड : 11
तळा : 10
उरण : 54
रोहा : 45
माणगाव : 50
श्रीवर्धन : 12

Exit mobile version