गटारातून पाण्याची लाईन

गटारे उथळ झाल्याने नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी

| श्रीवर्धन | वार्ताहर |

श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते गावामध्ये पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदाराने अजब प्रकार केल्याची घटना समोर आली आहे. गावात असलेल्या सिमेंट काँक्रिटच्या गटारामधून पाईपलाईन टाकून सदर पाईपलाईनवर पुन्हा काँक्रिटचा मुलामा देण्यात आलेला आहे. त्यामुळे गटाराची खोली कमी होऊन गटारे उथळ झाली आहेत. पर्यायाने पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरण्याचा प्रकार घडला आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते गावात पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईन संबंधित ठेकेदाराने गटारामधून टाकल्याचे पाहायला मिळत आहे. गटारातून पाईपलाईन टाकून त्यावरती काँक्रिटचा मुलामा देऊन पाईप झाकण्याचा प्रयत्न ठेकेदाराने केला आहे. परंतु, त्या ठिकाणी पाईप लिकेज झाल्यास गटाराचे दूषित पाणी त्या पाईपलाईन मध्ये जाऊन नागरिक आजारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वास्तविक पाहता ठेकेदाराने नळाची पाईपलाईन टाकण्यासाठी स्वतंत्रपणे चर खणून त्यामधून पाईपलाईन टाकणे आवश्यक होते. परंतु खर्च वाचवण्यासाठी संबंधित ठेकेदाराने आयत्या सिमेट काँक्रीटच्या गटारांमधून पाईपलाईन टाकल्याचे निष्पन्न झाले आहे. पाईपलाईन टाकून त्यावरती सिमेंट काँक्रीट टाकल्याने गटारांची खोली कमी झाली आहे व गटारे उथळ झाल्यामुळे हस्त नक्षत्राच्या पडलेल्या जोरदार मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी जाण्याची घटना घडली आहे. तरी श्रीवर्धन पंचायत समितीकडून संबंधित पाणीपुरवठा योजनेची चौकशी व्हावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. पाईप लाईन टाकण्यासाठी चर खोदण्याचा खर्च वाचवून सदर कामामधून जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी संबंधित ठेकेदाराने असा प्रकार केल्याचे बोलले जात आहे. तसेच ठेकेदार हा एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता देखील असल्याने याबाबतीत सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

Exit mobile version