मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर साचले पाणी

मुसळधार पावसाने रायगड बेहाल; प्रशासन अलर्ट मोडवर

| पाली /बेणसे | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सलग मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील काही सखल भागांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहनांची वाहतूक संथ गतीने सुरू आहे.

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नदीकाठच्या गावांमध्ये प्रशासनाकडून विशेष सतर्कता बाळगण्यात येत असून, पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागोठणे रेल्वे पूल, बायपास व माणगाव या ठिकाणी महामार्गांवर पाणी साचत आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होत आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, महसूल विभाग, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, पोलीस विभाग तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरडप्रवण क्षेत्रे, नदीकाठची गावे आणि सागरी किनारपट्टीवरील भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. हवामान विभागाने जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आले असून नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळावे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, सततच्या पावसामुळे शेती, वाहतूक आणि दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होत असून, पुढील काही तास जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील चांढवे खुर्द येथे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. एल अँड टी कंपनीने केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा फटका नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. शुक्रवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे चांढवे खुर्द येथील सर्विस रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली होती. सकाळी 8.30 वाजता पोलादपूरहून पुण्याकडे जाणारी एसटी बस या साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत होती. मात्र, सर्विस रोडवरील पाणी साचलेल्या भागात बस अडकली. चालकाने प्रसंगावधान राखत बस त्या ठिकाणी दीड ते दोन तास थांबवली होती, ज्यामुळे एक मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे महामार्गाच्या कामाचा दर्जा आणि संबंधित कंत्राटदार कंपनीच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
Exit mobile version