जल अर्पण दिवस उत्साहात साजरा

| अलिबाग | प्रतिनिधी |

जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला कायमस्वरूपी शुद्ध व पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने मंजूर करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजना आता संचालन व देखभाल दुरुस्तीच्या टप्प्यात प्रवेश करत असून, या योजनांचे जबाबदारीपूर्वक हस्तांतरण व्हावे आणि ग्रामस्थांनी त्यांची शाश्वत देखभाल करावी या हेतूने अलिबाग तालुक्यातील वरंडे ग्रामपंचायत आंबेपूर येथे जल अर्पण दिवस विविध उपक्रमांच्या माध्यमांतून उत्साहात साजरा करण्यात आला.

सदरील कार्यक्रमा दरम्यान सभेत पाणी पुरवठा योजनेची संपूर्ण माहिती ग्रामस्थांना देण्यात आली. योजनेची रचना, पाणी स्त्रोत, शुद्धीकरण प्रक्रिया, वितरण व्यवस्था तसेच भविष्यातील देखभाल दुरुस्तीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले व योजना कायमस्वरूपी सुरळीत चालू ठेवण्यासाठी ग्रामस्थांकडून सामूहिक जबाबदारीची हमी घेण्यात आली. जलसवंर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी गावातून प्रभात फेरी काढून घोषवाक्याद्वारे जनजागृती केली. पाण्याच्या नळाला व टाकीला जलबंधन बांधून जलसंपत्तीबद्दल आदर व सामूहिक जबाबदारीची भावना व्यक्त करण्यात आली. यावेळी परिसर रांगोळी व फुलांनी सजवून उत्सवी वातावरण निर्माण करण्यात आले. कार्यक्रमस्थळी उपस्थित ग्रामस्थांनी जल प्रतिज्ञा घेत पाण्याची बचत व योग्य वापर करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच सुरक्षित पिण्याच्या पाण्याबाबत जनजागृती व्हावी यासाठी एफ.टी.के.द्वारे पाणी शुद्धीकरणाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले व पाण्याची गुणवत्ता तपासणीची पद्धत समजवून सांगण्यात आली. शेवटी ग्रामीण पाणी पुरवठा विभागांमार्फत योजना हस्तांतरणांची प्रक्रिया पूर्ण करून ग्रामस्थांना अधिकृत हस्तांतरण दस्ताऐवज सुपूर्द करण्यात आले. कार्यक्रमांस अलिबाग पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी शर्मिला पाटील, विस्तार अधिकारी हेमलता वाडेकर, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे सल्लागार आनंद धिवर, सुनील माळी, नेहा थळे, अदिती मगर, स्मिता पाटील, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता निहाल चवरकर व कनिष्ठ अभियंता, ग्रामपंचायत अधिकारी, बीआरसी गट संसाधन केंद्र पाणी व स्वच्छता विभाग, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जल अर्पण दिवसाच्या निमित्ताने जलसंवर्धन, शाश्वत पाणी व्यवस्थापन व सामूहिक जबाबदारीचा संदेश प्रभावीपणे पोहचल्याचे चित्र या उपक्रमातून दिसून आले.

Exit mobile version