शेतीमध्ये पाणी साचल्याने पिके कुजण्याची भीती; शासनातर्फे नुकसानभरपाई देण्याची मागणी
| चिरनेर | प्रतिनिधी |
गेल्या तीन ते चार दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे उरण तालुक्यातील भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतात पाणीच पाणी झाले असून, लावलेल्या भाताची रोपेही वाहून गेली असल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकर्यांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी उरण तालुक्यातील शेतकर्यांनी केली आहे.
जून महिन्याचा शेवटचा आठवडा व जुलै महिना उजाडल्यापासून सलग पाऊस पडत असल्याने उरण तालुक्यात भातशेतीची पेरणी आटोपली होती. रोपांची वाढदेखील बर्यापैकी झाली होती, त्यामुळे चांगले उत्पादन होईल अशी आशा होती, मात्र जुलै महिन्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे भातशेतीचे नुकसान झाले. पुरामुळे भाताच्या खाचरांमध्ये चिखल गोळा झाला आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे शेतांचे बांधदेखील फुटले आहेत.
शेतातील सुपिक मातीदेखील खरडून गेली आहे. शेतात दगडगोटे वाहून आले आहेत. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी उरणमधील स्थानिक शेतकरी करत आहेत. उरण तालुक्यातील पूर्व विभागातील, खोपटे, कोप्रोली, पाणदिवे, आवरे, गोवठणे, पाले, पिरकोन, सारडे, वशेणी, पुनाडे, मोठी जुई, कळंबुसरे, चिरनेर, भोम, टाकीगाव, विंधणे, वेश्वी, दिघोडे व कंठवली या गावांमध्ये अजूनही शेती लावली जाते. मात्र, सलग तीन ते चार दिवस पडणार्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झालेले पाहायला मिळत आहे.
याशिवाय बी-बियाणे, खत, मजुरांची मजुरी या खर्चाचा बोजा शेतकर्यांवर पडणार आहे. व्यवस्थित पाऊस झाल्यामुळे लावणीला या भागात सुरुवात झाली होत काही लोकांच्या लावण्याही पूर्ण झाल्या होत्या. भरघोस पीक येईल अशी आशा परिसरातील शेतकर्यांना होती. मात्र, अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरले असून, दुबार पेरणीचे संकट शेतकर्यांवर येऊन ठेपले आहे. तर काही शेतकर्यांनी भाताचे रो घरी करून ठेवण्याचीदेखील तयारी केली आहे.
आमच्या शेतांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. बी-बियाणे, खते यालादेखील बराच खर्च झाला आहे. त्यात वाढत्या महागाईमुळे बियाणे, खते यांचे भावही वाढले आहेत. शेतात अतिवृष्टीमुळे पाणी झाल्याने आमचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे, त्यामुळे आमच्या शेतांचे पंचनामे करून आम्हाला नुकसानभरपाई मिळावी.
बळीराम भोईर, शेतकरी, सारडे-उरण
पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा येथील शेतकर्यांचे नुकसान झाले तर त्यांना नुकसानभरपाई मिळते. मात्र, आमचे नुकसान झाले तरी आम्हाला शासनाच्यावतीने कोणतीही भरपाई मिळत नाही. नेहमी आमच्या विभागाला दुर्लक्षित केले जाते.
हरिश्चंद्र खारकर, शेतकरी, पाणदिवे, उरण