दिल्ली गाठण्याच्या महायुतीच्या मनसुब्यावर पाणी

रायगडात शेकाप-काँग्रेसची भूमिका निर्णायक

| रायगड | खास प्रतिनिधी |

लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. राजकीय पक्षांनी त्यासाठी तयारीदेखील सुरु केली आहे. विविध मतदारसंघांवर दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजपा या महायुतीतील घटक पक्षांनी रायगड लोकसभा मतदारसंघावर आपाला हक्क सांगितला आहे. दोन्हीकडून विजयाची खात्री दिली जात आहे. मात्र, या ठिकाणी शेकाप आणि काँग्रेसची मते निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या खासदार सुनील तटकरे आणि धैर्यशील पाटील यांच्या दिल्ली गाठण्याच्या मनसुब्यावर पाणी फिरणार असल्याचे दिसून येते.

शेकाप, शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस हे ‌‘इंडिया’ आघाडीत आहेत. या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाकडून माजी खासदार अनंत गीते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेस या मतदारसंघाची मागणी करत असली तरी जागावाटपामध्ये तो मतदारसंघ गीतेंकडेच जाण्याची अधिक शक्यता आहे. गीतेंनी आपल्या खासदारकीच्या कालावधीत मतदारसंघामध्ये कामे केली आहेत. स्वच्छ चारित्र्य आणि भ्रष्टाचाराचे आरोप नसलेली व्यक्ती म्हणजे अनंत गीते अशी त्यांची जनमानसात प्रतिमा आहे. 2014 साली गीतेंनी तटकरेंचा चांगलाच पराभव केला होता. तेव्हा शेकापने गीतेंना मदत केली होती. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तटकरेंकडून गींतेना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यावेळी शेकाप आणि काँग्रेसने आपली ताकद तटकरेंच्या मागे उभी केली होती. हे कोणालाच नाकारता येणार नाही. आता गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. राजकीय समीकरणेदेखील बदलली आहेत.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची दोन शकले झाली आहेत. शिंदे आणि ठाकरे असे शिवसेनेचे दोन गट झाले आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट आणि अजित पवार गट झाले आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघातून खासदार बनण्याचे स्वप्न बघून लालबावटा सोडून कमळ हाती घेतलेले पाटील यांची अवस्था तटकरेंच्या दाव्यामुळे धुळीला मिळणार आहे. तसेच तटकरे यांची दिल्लीवारी शेकाप-काँग्रेसमुळे हुकणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. नुकत्याच झालेल्या माणगाव आणि अलिबाग येथील भाजपाच्या मेळाव्यात तटकरे यांच्याविरोधात सूर आवळण्यात आला होता. भाजपाने जिल्ह्यामध्ये आजी-माजी आमदारांसोबत गुप्त बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. तटकरेंना कसे रोखायचे याची रणनीती आखली जात आहे. त्याचप्रमाणे तटकरेंनीसुद्धा तयारी सुरु केली असून, जिल्ह्याच्या विविध भागांमधील कार्यकर्त्यांना निधी दिला जात आहे. भाजपा आणि अजित पवार गटाने कितीही शड्डू ठोकला तरी, शेकाप आणि काँग्रेसची थाप ही गीतेंच्याच पाठीवर पडणार आहे. त्यामुळे इंडिया आघाडीचाच उमेदवार विजयी होणार असल्याचे चित्र आहे.

Exit mobile version