| पनवेल | ग्रामीण प्रतिनिधी |
मुंब्रा-पनवेल महामार्गावरील कळंबोली सर्कल परिसरात एमजेपीच्या जलवाहिन्यांना मोठ्या प्रमाणात गळती लागल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या गळतीमुळे दररोज हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात असून पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे.
विशेष म्हणजे, या वाहिन्यांमधून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा वापर परिसरातील ट्रक चालक अंघोळीसाठी करताना दिसत आहेत. तसेच, काही कँटिंग चालक व स्थानिक व्यावसायिक देखील हेच पाणी वापरत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पाण्याचा गैरवापर उघडपणे सुरू असल्याचे स्पष्ट होते. अधिक चिंताजनक बाब म्हणजे काही टँकर मालक या गळतीच्या पाण्याचा थेट टँकरद्वारे साठा करून विक्री करत असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. सार्वजनिक पाणीपुरवठ्याचा असा गैरवापर होत असताना संबंधित प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.







