खारेपाटात पाणीसमस्या भीषण; ग्रामस्थांमध्ये शासनाविरोधात संताप

29 गावांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण

| खरोशी | वार्ताहर |

पेण तालुक्यातील वाशी-शिर्की खारेपाटातील 29 गावे 43 वाड्यांना गेले कित्येक वर्षे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. शहापाडा पाणीपुरवठा योजनेच्या जवळील बोटावर मोजण्याइतकी गावे सोडल्यास उर्वरित सर्वच गावांना जानेवारीपासूनच टँकर आणि गाव तलवांच्या पाण्यावर तहान भागवावी लागत असून, ते पाणी घरगुती कारणासाठी वापरावे लागत आहे. पाण्यासाठी अनेक उपोषणे, आंदोलन करुनही आश्वासनांखेरीज हाती काहीच लागले नसल्याने ग्रामस्थांमध्ये शासनाविरोधात संतापाची भावना आहे.

वाशी खारेपाट व शिर्की खारेपाटातील नागरिक सतत आंदोलन करून पाणीटंचाईचा प्रश्न निकाली निघावा यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. नागरिकांची सततची मागणी, आंदोलनाची दखल घेऊन हेटवणे ते शहापाडा व शहापाडा ते पेण खारेपाट अशी जीवन प्राधिकरण विभागाकडून हेटवणे धरण ते शहापाडा धरण वाढीव उद्भव पाणीपुरवठा योजनेला 38 कोटी निधी मंजूर झाला. या योजनेच्या कामला 2017 ला सुरुवात झाली. ही योजना 10 डिसेंबर 2019 ला पूर्ण करायची होती; परंतु ही योजना प्रशासनाच्या व ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे काम पूर्ण झाले नाही. नंतर 27 डिसेंबर पुनर्निविदा प्रक्रिया करुन नवीन ठेकेदाराला 22 जुलै 2022 पर्यंत काम पूर्ण करण्याचा कालावधीतसुद्धा पूर्ण केले नाही.

यापूर्वी योजनांसाठी पैसा उपलब्ध करुन योजना पूर्ण करा, अशी मागणी जनतेला करावी लागत होती. मात्र, योजनेसाठी प्रचंड पैसा, योजनेला मंजुरी असताना योजना पूर्ण केल्या जात नाही, ही लाजिरवाणी गोष्ट असून, पेण खारेपाटाच्या नागरिकांसाठीदेखील मोठी दुर्दैवाची बाब आहे. दरम्यान, खारेपाट विभागातील तरुण पिढी गावात पाणी नाही म्हणून पेण शहरात स्थलांतरित होत आहे. जर पाणी उपलब्ध असते, तर स्वतःच्या जागेत टुमदार घरे बांधून ही मंडळी गावातच राहिली असती. पण, फक्त आणि फक्त पाण्याच्या दुर्भिक्षतेमुळे हे सर्व होत असल्याची प्रतिक्रिया येथील बुजुर्ग मंडळींकडून व्यक्त होत आहे.

सिंचन योजना कागदावर
हेटवणे धरणाची निर्मिती मुंबई व त्या परिसरातील वाढत्या लोकसंख्येच्या पाण्याच्या तहानेची गरज गृहीत धरून झाली आहे. पेण, खालापूर, सुधागड या तीन तालुक्यांची जमीन संपादित करुन हेटवणे धरण बांधले आहे. मात्र, पेण तालुक्यातील गावे प्रामुख्याने बाधित झाल्यामुळे येथील जनतेच्या त्यागाचा मोठा वाटा आहे. मात्र, येथील जनतेला सिंचनाचे गाजर दाखवून डावे-उजवे कालव्यांचे खोदकाम केले गेले; परंतु आता ते बुजून जाऊ लागले आहेत. खारेपाट विभागातील शेतकऱ्यांच्या 7/12 उताऱ्यावर सिंचनाचे शिक्के आहेत. तरीसुद्धा सेझसाठी जमिनी का व कशा विकल्या गेल्या, हा प्रश्न उपस्थित होत आहे. मग सिंचनासाठी राखून ठेवलेला पाणीसाठा, कालव्यासाठीच्या निधीचा वापर कुठे झाला, असा प्रश्नही येथील जनता विचारत आहे.
अधिकाऱ्यांकडून उडवाउडव
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा विभागाविरोधात 7 डिसेंबर रोजी खारेपाट विकास संकल्प संघटनेमार्फत आमरण उपोषण करण्यात आले. ते उपोषण 14 डिसेंबरपर्यंत सुरु होते. तेव्हा एमजीपी पेण पाणीपुरवठा अधिकारी कोठेकर यांनी लेखी पत्र देऊन 25 डिसेंबर रोजी पाणीपुरवठा वाशी येथील टाकीत सोडण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, आजपर्यंत दोन महिने होऊन गेले; परंतु काम पूर्ण केले नाही. यासंदर्भात विचारणा करण्यासाठी खारेपाट संघटना गेली असता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पेणच्या अधिकाऱ्यांनी आत्ता काम होणार नाही, पाईपलाईन फुटली आहे, वेळ लागेल, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली.
आंदोलकांवर गुन्हे दाखल
लेखी आश्वासन देऊन काम न केल्याबद्दल विचारणा करण्यासाठी ग्रामस्थ गेले असता मिळालेल्या उत्तरामुळे संतप्त ग्रामस्थांनी सदर कार्यालयाला टाळे ठोकून अधिकाऱ्यांसह स्वतःला कोंढून घेतले. यावेळी पेण पोलीस ठाण्यात संघटनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
अधिवेशनातील आश्वासन हवेत
हेटवणे धरण मध्यम प्रकल्पाच्या कालव्याचे काम गेली सोळा वर्षांपासून प्रलंबित आहे. याच पाण्यावर येथील 52 गावांमधील 4268 हेक्टर सिंचन क्षेत्र आणि हजारो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे. विधानपरिषदेत उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेटवणे प्रकल्पाच्या चतुर्थ सुप्रमा प्रस्तावास एक महिन्यात मान्यता प्रदान करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, याबाबत अद्याप काहीच हालचाली नाहीत. हेटवणे मध्यम प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंता दिनेश्री राजभोज यांनीसुद्धा लेखी पत्र दिले आहे.

शहापाडा धरणाचा पाणीपुरवठा नियमित होतो का अनियमित, याबाबत उपअभियंता पाणीपुरवठा यांचा अभिप्राय मागितला आहे. वाशी खारेपाटातील सर्व ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागितले आहेत. साधारणत: आठ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव आलेले आहेत. त्यासाठी दोन दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवून वाशी खारेपाटात पाण्याचे टँकर चालू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

भाऊसाहेब पोळ,
गटविकास अधिकारी, पेण

शासन निद्रावस्थेत असून, वाशी खारेपाटातील महिलांना पाण्यासाठी रात्र-रात्र जागे राहावे लागत आहे. रात्रभर जागून तुटपुंजे पाणी हाती लागत असल्याने महिलांमध्ये नाराजी आहे. झोपलेल्या प्रशासनाला जाग कधी येईल, पिण्याच्या पाण्यासाठी वाशी खारेपाट तहानलेला राहणार का?

प्रकाश माळी, अध्यक्ष,
वाशी खारेपाट विकास संकल्प संघटना
Exit mobile version