उपसभापतींनी बोलावली बैठक
| अलिबाग | प्रतिनिधी |
गेली कित्येक वर्षे खारेपाटातील पाणी प्रश्न प्रलंबित असून अनेक आंदोलने, मोर्चे, उपोषण करुनही शासनाने त्याबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. परिणामी, शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत अधिवेशनात आवाज उठविला. खारेपाटातील पाणी समस्येला उपसभापती निलम गोऱ्हे यांनी दुजोरा देत गुरुवारी (दि.29) रायगडचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत त्यांच्या दालनात बैठक घेण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे खारेपाटातील पाणी प्रश्न लवकरच सुटेल, अशी आशा पल्लवित झाली आहे.
खारेपाटातील पाणी प्रश्नासाठी पेणमधील तरुणांनी एकत्र येऊन लढा दिला आहे. पाण्यासाठी होणारी वणवण थांबविण्यासाठी वाशी येथील जगदंबा पटांगणावर उपोषणाचे हत्यार उगारले. हा पाणी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन महिन्यापुर्वी दिले होते. त्या आश्वासनानंतर तरुणांनी उपोषण मागे घेतले होते. परंतु दिलेला शब्द न पाळल्याने खारेपाटातील पाणी प्रश्न प्रलंबितच राहिला. त्यामुळे शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी या पाणी प्रश्नांबाबत अधिवेशनात आवाज उठविला. खारेपाटातील पाणी प्रश्नांवर आक्रमक होऊन तेथील पाण्याची समस्या तातडीने सोडविण्यात यावी, अशी मागणी केली. त्यांच्या मागणीला उपसभापती निलम गोऱ्हे यांनी दुजोरा देत खारेपाटातील पाणी प्रश्न गंभीर आहे. उपमुख्यमंत्र्यांकडून हा प्रश्न सोडविण्यासाठी लेखी पत्र घेण्यात येईल. अन्यथा पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या समवेत गुरुवारी (दि.29) रोजी बैठक घेतली जाईल, असे आश्वासन विधान परिषद उपसभापती यांनी दिले.