आमदारांच्या थळमध्ये पाणीप्रश्‍न कायम



थळ चाळमळा महिलांचा ग्रामपंचायतीत ठिय्या
सरपंच, ग्रामसेवक गायब झाल्याने संताप

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबागचे स्थानिक आमदार थळ ग्रुप ग्रामपंचायतीत ग्रामस्थांना पिण्याचे पाणी पुरवू शकत नसल्याने सोमवारी थळ बाजार कोळीवाडामधील ग्रामस्थ आक्रमक झाल्यानंतर आता दुसर्‍या दिवशी थळ चाळमळा येथील महिलांनी थळ ग्रामपंचायतीच्या कार्यालयात चार तास ठिय्या आंदोनल केले. मात्र, ग्रामस्थांच्या प्रश्‍नाला सामोरे जाण्याऐवजी थळचे सरपंच, ग्रामसेवक यांनी आपले मोबाईल स्वीच ऑफ ठेवून गायब राहिल्याने महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला. पाण्याच्या मागणीसाठी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेणार असल्याचे महिलांनी सांगितले.

आरसीएफसारखा कारखाना असलेली थळ ग्रुप ग्रामपंचायत तालुक्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत समजली जाते. स्थानिक आमदार यांची सत्ता असतानाही इतक्या वर्षात या ग्रामपंचायतीचे मूलभूत प्रश्‍नदेखील त्यांना सोडविण्यात आलेले नाहीत. थळ बाजार कोळीवाडा येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याऐवजी त्यांच्याविरोधात तक्रार केल्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. अलिबाग पोलीस ठाण्यात या विषयावर बैठकीत पाण्याचा पुरवठा सुरळीत करण्याचे आश्‍वासन देणार्‍या ग्रामपंचायतीच्या विरोधात मंगळवारी थळ चाळमळा येथील महिलांनी धडक देत हल्लाबोल केला. अनेक वर्षांपासूनचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडवू न शकलेल्या ग्र्रामपंचायतीच्या विरोधात महिला आक्रमक झाल्या होत्या. रात्री 2-2 वाजेपर्यंत जागूनदेखील पाणी मिळत नसल्याने पिण्याचे पाणी विकत आणायची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.

ग्रामपंचायत पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यास असमर्थ ठरत असल्याने दोन दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेऊन आपले ग्रार्‍हाणे मांडण्याचा निर्णय महिलांनी घेतला आहे.

सरपंच, ग्रामसेवक गायब
महिला ग्रामपंचायत कार्यालयात आल्यानंतर तीन-चार तास वाट बघूनदेखील सरपंच, ग्रामसेवक फिरकलेदेखील नाहीत. त्यांना मोबाईलवर संपर्क साधण्याच प्रयत्न केला असता, त्यांचे मोबाईल स्वीच ऑफ असल्याचे दिसून आले. त्यामुळे कोणतेच उत्तर मिळत नसल्याने महिला आणखी संतप्त झाल्या होत्या. उशिरापर्यंत थांबून शेवटी त्यांना कोणत्याही उत्तराशिवायच परत जावे लागले.

Exit mobile version