शिवकर ग्रामपंचायतीमार्फत जलशुद्धीकरण केंद्र

ग्रामस्थांसाठी ग्रामपंचायतीची दिवाळी भेट

| पनवेल | वार्ताहर |

रायगड जिल्ह्यतील प्रथम क्रमांकाची ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणार्‍या शिवकर ग्रामपंचायतीमार्फत जलशुद्धीकरण केंद्र उभारून ग्रामस्थांना शुद्ध मिनरलयुक्त पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल ढवळे यांच्या पुढाकाराने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे.

या जलशुद्धीकरण केंद्रात इनलाइन वॉटर फिल्टर आहे. म्हणजेच, ज्या ठिकाणी पाण्याची जोडणी केलेली आहे, त्याच ठिकाणी पाणी फिल्टरद्वारे शुद्ध केले जाते. पाणी शुद्ध झाल्यानंतर ते पाण्याच्या टाकीत जाते. त्यानंतर टाकीतील पाणी गावातील प्रत्येक घरातल्या नळ कनेक्शन सोडले जाते. संपूर्ण गावाला एकाच वेळेस इनलाईन वॉटर फिल्टरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. हे नॅचरल प्लांट असून, पनवेल तालुक्यामध्ये शिवकर ग्रामपंचायतीने हा राबविलेला पहिलाच उपक्रम आहे. या प्लांटची किंमत 24 लाख 50 हजार एवढी असून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून याची निर्मिती करण्यात आलेली आहे.

शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आस्वाद पाटील यांच्या माध्यमातून शिवकर गावाला शुद्ध पाणी प्रकल्प देण्यात आले. दूषित पाण्यामुळे बहुतांशी आजार पसरत असतात. याबाबत विचार विनिमय करुन सरपंच अनिल ढवळे यांनी संपूर्ण गावाला या जलशुद्धीकरण केंद्रातून शुद्ध पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. समाजोपयोगी तसेच विकासाचे रोल मॉडेल म्हणून पनवेल तालुक्यातील शिवकर ग्रामपंचायतीची ओळख आहे. या ओळखीला साजेसा असा उपक्रम सरपंच अनिल ढवळे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी ग्रामस्थांसाठी राबविला आहे.

Exit mobile version