अलिबागकरांवर पाणीकपातीचे संकट

48 गावांना एक दिवसआड पाणीपुरवठा

| अलिबाग | प्रमोद जाधव |

उन्हाळ्यात पाणीटंचाईशी सामना करण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने एक जानेवारीपासून एक दिवसआड पाणीपुरवठा सुरु केला आहे. त्यामुळे नवीन वर्षापासून उमटे धरणातून 48 गावांमध्ये पाणीकपातीचे संकट सुरु झाले आहे. गतवर्षी 16 जानेवारीपासून एक दिवसआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले होते. यंदा मात्र गतवर्षीच्या तुलनेने 16 दिवस अगोदरच पाणीकपात सुरू करण्यात आल्याने नागरिक चिंतेत आहेत.

उमटे धरणाची निर्मिती 1978 मध्ये करण्यात आली. धरणाची उंची 56.40 मीटर, तर साठवण क्षमता 87 दशलक्ष घनफूट आहे. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत उमटे धरणाच्या देखभाल-दुरुस्तीचे काम केले जाते. तालुक्यातील सुडकोली, रामराज, चिंचोटी, बेलोशी, बोरघर, रेवदंडा, चौल, नागाव, आक्षी, बामणगाव या 12 ग्रामपंचायतींमधील जवळपास 48 गावे-वाड्यांमधील साधारणतः 40 हजारांहून अधिक नागरिकांची तहान धरणाद्वारे भागवली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून धरणाचा गाळ न काढल्याने मे महिन्यात पाणीटंचाईची समस्या कायमच भेडसावत राहिली आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी जलसंधारण विभागाच्या मदतीने धरणातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले होते. मात्र, ते अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही. त्यासाठी जिल्हा परिषदेने दहा लाखांहून अधिक रुपये खर्च केले होते. परंतु, सेस फंडातून खर्च करण्यात आलेला निधी पाण्यात गेला आहे. प्रशासनाच्या वेळकाढूपणामुळे अद्यापपर्यंत या धरणात गाळ रुतूनच राहिला आहे. जिल्हा परिषद उदासीनतेमुळेे अनेक गावे-वाड्यांतील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागते.

उमटे धरणातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. नागरिकांना जूनपर्यंत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी एक जानेवारीपासून पाणीकपातीला सुरुवात केली आहे. याबाबत तालुक्यातील ग्रामपंचायतींनादेखील कळविण्यात आले आहे. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा.

निहाल चवरकर, उपअभियंता,
ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, अलिबाग पंचायत समिती
नागाव, आक्षीमध्ये पाण्याचे नियोजन
अलिबाग तालुक्यातील नागाव व आक्षी ही पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची गावे असल्याने या ठिकाणी नागरिकांना व पर्यटकांना मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी आक्षीमध्ये एमआयडीसीकडून पाण्याची जोडणी घेण्यात आली आहे. तर, नागावमध्ये जलजीवन अंतर्गत प्रस्ताव घेतला आहे. त्यामुळे या पर्यटनाच्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नसल्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे.
Exit mobile version