पारंपरिक विहिरी, तलाव दुर्लक्षित; रेन वॉटर हार्वेस्टिंग कागदावरच
| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यात पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असून, अनेक भागांमध्ये पाणीपुरवठ्यावर कपात करण्यात आली आहे. यावर्षी मान्सून उशिरा दाखल होत असल्याने आणि वाढत्या उष्णतेमुळे जलसाठा झपाट्याने घटत असल्याने उरणकरांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे या संकटाचा इशारा उरण तालुका मराठी पत्रकार संघाने काही महिन्यांपूर्वीच दिला होता. मात्र, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू यांनी केला आहे.
उरण तालुका मराठी पत्रकार संघाने नगरविकास मंत्री, रायगड जिल्हा परिषद, पंचायत समिती, गटविकास अधिकारी, उरण नगरपरिषद, नगराध्यक्षा आणि संबंधित विभागांना लेखी निवेदन देऊन रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करणे, जुन्या विहिरींचे सर्वेक्षण व पुनरुज्जीवन, तलावांचे संवर्धन आणि जलसंधारणाची व्यापक मोहीम राबविणे यासंदर्भात मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने या मागण्यांची कोणतीही गंभीर दखल घेतली नसल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यात दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर बनते. अनेक गावांमध्ये महिलांना पाण्यासाठी मैलोनमैल भटकावे लागते. काही भागांमध्ये टँकरवर अवलंबून राहावे लागते, तर शहरातील अनेक भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत असतात. आता पाऊसही लांबल्याने नागरिकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
विशेष म्हणजे तालुक्यातील अनेक पारंपरिक विहिरी, तलाव आणि जलस्रोत आजही दुर्लक्षित अवस्थेत पडून आहेत. अनेक विहिरी गाळाने भरल्या असून त्यांची साफसफाई किंवा पुनरुज्जीवन करण्यासाठी कोणतीही प्रभावी मोहीम राबविण्यात आलेली नाही. अनेक गावांतील पाणवठे नामशेष होण्याच्या मार्गावर असतानाही प्रशासनाला त्याचे गांभीर्य नसल्याचा आरोप होत आहे.
दुसरीकडे उरणमध्ये मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण प्रकल्प, उंच इमारती, व्यावसायिक संकुले आणि औद्योगिक प्रकल्प उभे राहत आहेत. मात्र, या प्रकल्पांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे वास्तव समोर येत आहे. अनेक ठिकाणी ही योजना केवळ कागदावर असून, प्रत्यक्षात पावसाचे कोट्यवधी लिटर पाणी थेट नाल्यातून समुद्रात वाहून जात असल्याची टीका होत आहे.
पत्रकार संघाने प्रशासनाला यापूर्वीच स्पष्ट सूचना केली होती की, पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडविले नाही तर भविष्यात उरणला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागेल. प्रत्येक शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय, गृहनिर्माण सोसायटी, औद्योगिक प्रकल्प आणि मोठ्या इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करणे गरजेचे आहे. तसेच बंद पडलेल्या विहिरी, तलाव आणि पारंपरिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेणे आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले होते. मात्र, प्रशासनाने वेळेत पावले उचलली नाहीत आणि आता उरणमध्ये पाणीकपातीची वेळ आली आहे. पाऊस आणखी लांबला तर परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संकट दारात आल्यानंतर बैठका घेण्यापेक्षा संकट येण्यापूर्वी नियोजन करणे आवश्यक असते. परंतु, उरणमध्ये आजही ठोस जलधोरण आणि कृती आराखडा नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढू लागला आहे.
उरण तालुका मराठी पत्रकार संघाने पुन्हा एकदा मागणी केली आहे की, तालुक्यातील सर्व विहिरी, तलाव आणि जलस्रोतांचे तातडीने सर्वेक्षण करून त्यांचे पुनरुज्जीवन करण्यात यावे, रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करण्यात यावे आणि जलसंधारणासाठी विशेष कृती आराखडा जाहीर करण्यात यावा.
एका थेंबासाठी करावा लागेल संघर्ष
अन्यथा दरवर्षीप्रमाणे पाणीटंचाई, टँकर माफियांचा सुळसुळाट, नागरिकांची फरफट आणि प्रशासनाची निष्क्रियता हेच चित्र कायम राहील. पाऊस लांबल्यामुळे संकटाची घंटा वाजली आहे. अजूनही प्रशासन जागे झाले नाही तर भविष्यात उरणकरांना पाण्याच्या एका थेंबासाठी संघर्ष करावा लागेल, असा इशारा उरण तालुका मराठी पत्रकार संघाने दिला आहे.
