चार दिवस आड पाणी; हजारो नागरिकांची पाण्यासाठी वणवण
| रायगड | प्रमोद जाधव |
मुरूड तालुक्यातील साळावपासून रोहा तालुक्यातील किल्लापर्यंतच्या सुमारे चाळीस गावांवर सध्या पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. या गावांना नियमित होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने नागरिकांना आता तब्बल चार दिवस आड पाणी मिळत आहे. त्यामुळे हजारो नागरिकांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे.
साळाव येथील कंपनीमधील प्लांट बंद पडल्याने या भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून देण्यात आली आहे. नियमित पाणीपुरवठा अचानक बंद झाल्याने मुरूड आणि रोहा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्याचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मिळणारे पाणीही नागरिकांच्या गरजा भागविण्यास अपुरे पडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. परिणामी पिण्याचे पाणी, घरगुती वापर आणि दैनंदिन गरजांसाठी नागरिकांना अतिरिक्त पाण्याची व्यवस्था करावी लागत आहे. एकीकडे पावसाळा सुरू असतानाही चाळीस गावांतील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने प्रशासनाच्या पाणी नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मिळालेल्या सुत्रांकडून माहितीनुसार, मुरूड तालुक्यातील साळाव परिसरात लोखंड उत्पादन करणारी कंपनी गेल्या अनेक वर्षापासून आहे. गॅसचे वाढते दर, भरमसाठ येणारे वीज बील त्यामुळे खर्च अधिक आणि उत्पादन कमी अशी स्थिती या प्रकल्पाची झाली. त्यामुळे गेल्या सहा महिन्यापासून हा प्रकल्प बंद पडला आहे. या प्रकल्पासह मुरूडमधील साळावपासून रोहामधील किल्लापर्यंतच्या 40 हून अधिक गावे आणि वाड्यांना कंपनीद्वारे पाणी पुरवठा नियमीत केला जात होता. परंतू गेल्या काही दिवसांपासून पाणी कपातीचे संकट या गावांवर आले आहे. पावसाळी हंगाम असतानाही पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
चार दिवस आड होणारा पाणीपुरवठाही केवळ अर्धा ते एक तासासाठी केला जात असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या अल्पकाळात मिळणारे पाणी साठवून ठेवण्यासाठी हजारो नागरिकांना, विशेषतः महिलांना, प्लास्टिकच्या बादल्या, ड्रम तसेच इतर भांड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे दैनंदिन वापरासाठी पाणी पुरवताना ग्रामस्थांची अक्षरशः दमछाक होत आहे.
मुरूड आणि रोहा तालुक्यातील या गावांमध्ये पाण्याची टंचाई तीव्र होत असतानाही स्थानिक प्रशासनाकडून ती दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. पाणीटंचाईचे गांभीर्य प्रशासनाला कधी जाणवणार, असा सवालही नागरिक उपस्थित करीत आहेत.
दरम्यान, साळाव येथील लोखंड उत्पादन करणारी कंपनी बंद पडल्याने प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज आता राहिलेली नाही. असे असतानाही कंपनीलगतच्या गावांना मुबलक पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. कंपनीचा पाणीवापर कमी झाला असताना गावांची तहान मात्र कायम असल्याने पाणीपुरवठ्याच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
40 गावांचा वाली कोण?
साळाव येथील लोखंड उत्पादन करणारी कंपनी बंद पडल्याने प्रकल्पाची पाण्याची गरज कमी झाली; मात्र त्याच परिसरातील तब्बल 40 गावांचा पाणीप्रश्न अधिकच गंभीर झाला आहे. चार दिवसांनी अवघे अर्धा ते एक तास पाणी मिळत असल्याने महिलांसह हजारो ग्रामस्थांना बादल्या, ड्रम आणि हंड्यांमध्ये पाणी साठवून ठेवावे लागत आहे. कंपनी बंद पडली, पण गावांची तहान भागविण्याची जबाबदारी आता कोणाची? 40 गावांचा वाली कोण? हा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे.
साळाव येथील प्रकल्प बंद झाला आहे. तेव्हापासून मुबलक पाणी पुरवठा होत नाही. पाणी साठवून ठेवण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. चार दिवस आड पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे भर पावसात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. या गावांतील नागरिकांना नियमीत पाणी पुरवठा करण्याची गरज आहे.
ग्रामस्थ (नाव न सांगण्याच्या अटीवरून )
कंपनीला पाणी पुरवठा होत असताना साळावपासून किल्ला पर्यंतच्या गावांना पाणी पुरवठा केला जात होता. सध्या प्रकल्प बंद आहे. त्यामुळे कंपनीला पाण्याची गरज निर्माण होत नाही. त्यामुळे पाणी पुरवठा जास्त केला जात नाही.
कंपनीतील अधिकारी,
जेएसडब्लू ( नाव न सांगण्याच्या अटीवरून )
