रहिवाशांचा सिडकोवर कार्यालय धडक
| पनवेल | वार्ताहर |
करंजाडे वसाहतीमध्ये अनेक महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या ठिकाणी गरजेपुरते सुद्धा पाणी मिळत नाही. त्यामुळे संतप्त रहिवाशाने थेट सिडको कार्यालय गाठले. हातोड्याने गेटचा टाळा तोडून आंदोलकांनी आत प्रवेश करत सिडको अधिकाऱ्यांना लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करण्याची आग्रही मागणी करण्यात आली. करंजाडे वसाहतीला न्हावा- शेवा पाणीपुरवठा योजनेतून पाणी दिले जाते. जेएनपीटीकडे जाणाऱ्या वाहिनीमधून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वसाहतीला पाणीपुरवठा केला जातो. जलवाहिन्या बदलण्याचे काम सुरू असल्यामुळे पनवेल शहर, सिडको वसाहती, करंजाडे कॉलनीला सुद्धा मागणीप्रमाणे पाणीपुरवठा केला जात नाही.
एमजेपीच्या वाहिन्यांना फुटीचे ग्रहण लागल्याने ही परिस्थिती निर्माण होत आहे. करंजाडे कॉलनी पूर्णपणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर अवलंबून आहे. या यंत्रणेतून पाणीपुरवठा न झाल्यास वसाहतीला पाणी मिळत नाही. त्यामुळे या परिसराला बारामाही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या भागात बूस्टर पंप बसवण्यात आले असले तरी टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे. रहिवाशांनी वारंवार आंदोलन करूनही सिडकोला पाणीपुरवठा सुरळीत करता येत नाही.
महामार्ग रोखणार
करंजाडे येथील पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. येत्या आठ दिवसात पाणी सुरळीत सुरू झाले नाही तर विमानतळ रोड व जेएनपीटी महामार्ग बंद करण्याचा इशारा करंजाडेकरांनी दिला आहे.