पालीत पाणी पेटले; भरउन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा

संतप्त पालीकरांची नगरपंचायतीवर धडक

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

प्रख्यात अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या महाराष्ट्रातील धार्मिक स्थळ पाली बल्लालेश्वर नगरीत भरउन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई भेडसावत आहे. महिनाभरापासून येथील पाणीसमस्या अधिकच गंभीर बनली आहे. त्यामुळे पाण्यासाठी महिलांची वणवण भटकंती होतेय. पाली नगरपंचायतीकडे वारंवार तक्रारी देऊनही कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याने पालीकरांच्या संयमाचा बांध फुटला. पालीकर नागरिकांनी सोमवार (दि.15) रोजी एकजुटीने पाली नगरपंचायतीवर धडक देऊन पाणीप्रश्न जलद सोडवा अन्यथा उग्र जनआंदोलन छेडू, असा इशारा दिला.

पाली शहराला मागील अनेक वर्षांपासून पाणी समस्येने ग्रासले आहे. पाली अंबा नदीतून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र, दूषित पाणी, अनियमितता यामुळे पालीकर त्रस्त झालेले आहेत. महिनाभरात केवळ सरासरी दहा दिवस पाणी येते, तर इतर दिवशी पाण्याची बोंब असते. पाली नगरपंचायत करा म्हणजे वाढीव विकासनिधी उपलब्ध होईल, नागरिकांना चांगल्या दर्जेदार पायाभूत व नागरी सेवा सुविधा मिळतील, अशी भाबडी आशा पालीकर जनतेला होती. मात्र, आजची विकासशून्य परिस्थिती पाहता पालीकरांची घोर निराशा झाली.

पालीकरांना शुद्ध पाणीपुरवठा केला जाईल अशी पोकळ आश्वासने मागील निवडणुकीत देण्यात आली होती. पालीकर जनतेनेही त्यांच्यावर विश्वास ठेवून तुम्हीच आमचे तारणहार म्हणत त्यांना साथही दिली. मात्र, आजतागायत पालीकरांचा पाणीप्रश्न मार्गी लावला नाही. त्यामुळे पालीकरांच्या भावनेचा उद्रेक झाला व पाणीपुरवठा सुरळीत करा अन्यथा खुर्च्या खाली करा, अशी भूमिका पालीकर महिला व नागरिकांनी घेतली. यावेळी पालीचे माजी सरपंच राजेश मपारा यांनी प्रश्नांचा भडिमार केला. यावेळी आलाप मेहता म्हणाले की, ग्रामपंचायत काळात विकासाला काही अंशी दिशा होती, मात्र आता नगरपंचायत आल्यापासून दुर्दैवाने समस्यात वाढ होतेय, पूर्वीची ग्रामपंचायतच हवी होती.

दरम्यान, पालीच्या इतिहासात प्रथमच टँकरने पाणीपुरवठा करण्याची नामुष्की आल्याचे येथील बुजुर्ग व ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी सांगितले. पाली गावालगत बारमाही अंबा नदी वाहते, अनेक गावांची अंबा नदीने तहान भागवली आहे, मात्र जलनियोजनाचा अभाव, प्रशासनाची उदासीनता, नवखे लोकप्रतिनिधी व ठोस उपाययोजना राबविण्याकडे केलेले दुर्लक्ष यामुळे पालीकर भीषण पाणीटंचाईच्या झळा सोसत आहेत. ही परिस्थिती अशीच राहिली तर भविष्यात दिव्य विकासाचे स्वप्न पाहणारी पाली भकास झालेली पहावयास मिळेल, यासाठी विकासाच्या केवळ गमजा मारणारे लोकप्रतिनिधी व पुढारी जबाबदार असतील हेही तितकेच खरे.

प्रशासन काय म्हणाले..
दरम्यान, जनतेचा आक्रमकपणा पाहून पाली नगरपंचायत मुख्याधिकारी विद्या येरूणकर यांनी जनतेच्या रोषाला सामोरे जात त्यांची समस्या जाणून घेत पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत सकारात्मक आश्वासन दिले. पाणी समस्या सोडवण्यासाठी नवीन पाईप लाईन टाकणार आहोत, तरी नळातून होणारा पाणीपुरवठा जोपर्यंत सुरळीत होत नाही, तोपर्यंत पाली शहराला टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिले.

Exit mobile version