पेणमध्ये जलजीवन योजनेचे तीनतेरा

। पेण । प्रतिनिधी ।

मागच्याच महिन्यात पेण पंचायत समिती प्रशासनाकडून 2 कोटी 14 लाख 50 हजार रूपयांचा पाणी टंचाई संभाव्य आराखडा तयार झाला. महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये 54 गावे 109 वाडयांचा समावेश आहे. आणि यांना फक्त 9 ट्रॅकरनी पाणी पुरवठा केला जात आहे. पेण तालुक्यात 2021 पासून जलजीवन योजनेअतंर्गत 106 योजनांची मंजूरी मिळालेली आहे. यामध्ये आतापर्यंत फक्त 6 योजना पूर्ण झाल्या आहेत त्या 6 योजनांमध्ये देखील अनेक त्रुटी आहेत. एकंदरीत काय तर पेण तालुका प्रशासकीय नाकरतेपणा आणि लोकप्रतिनिधींचा दुर्लक्षतपणामुळे पेणकरांच्या घशाला कोरड पडली आहे एवढे नक्की.

लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरूवात झाली आहे. सर्व उमेदवारांकडून आश्‍वासनांचा पाऊस पडत आहे. परंतु 2019 ला दिलेल्या आश्‍वासनाचे काय? पेण तालुक्याचा विचार करता खासदार सुनील तटकरे यांनी एक भ्रशब्द ही पेण येथील जलजीवन योजनेवर कधी काढला नाही. तर आमदार रविशेठ पाटील यांनी प्रत्येक भाषणांत ‘हर घर नल’ याचा ओहापोह केला. परंतु 106 योजना पूर्ण झाल्या की नाही याबाबत कधीच भाष्य केले नाही. महत्त्वाची बाब म्हणजे या 106 योजनांचा विचार केल्यास जे ठेकेदार आहेत ते राजकीय पुढार्‍यांचे बगलबच्चे आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधी बोलायलाही पुढे येत नाहीत. कारण त्यांना सर्वसामान्य जनतेपेक्षा त्यांच्या ठेकेदार कार्यकर्ते जिवंत राहिले पाहिजेत. हा त्यांचा सरळ हेतू आहे असेच म्हणावे लागेल. जलजीवन योजनेअतंर्गत हर घर पाणी हे उद्देश होते. परंतु तीन वर्ष उलटून देखील 106 योजनांपैकी 6 योजना पूर्ण व्हाव्यात ही मोठी शोकांतिका. महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेसाठी निधीची ही कमतरता नाही. जलजीवन योजनेसाठी एकूण 11,518.17 लक्ष रूपये मंजूर असून त्यापैकी 2,927.56 लक्ष रूपये आतापर्यत खर्च झाला आहे. याचाच अर्थ निधी असूनही काम होत नाही याला सर्वस्वी जबाबदार लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी आहेत एवढे नक्की. राजकीय पुढार्‍यांना सर्व सामान्यांची मतं हवीत. मात्र त्यांच्या समस्या सोडविण्यात त्यांना रस नाही. आज मतांचा जोगवा मागण्यासाठी दारोदार येणा-या लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याची वेळ आलेली आहे. गेली पाच वर्षात आपण आमच्यासाठी काय केलेत? आम्ही आपल्याला का मतं द्यावीत? एवढे निश्‍चित.

Exit mobile version