तळा शहरात पाणीटंचाई

हंडाभर पाण्यासाठी होतेय वणवण

| तळा | वार्ताहर |

तळा शहराला गेल्या काही दिवसांपासून सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने शहरवासियांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तळा शहराला भेडसावणारा पाणीप्रश्‍न पुन्हा एकदा समोर आला आहे. तळा शहराला आंबेळी व धरण पाणीपुरवठा लाईन या दोन ठिकाणांहून पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र, धरण येथील पाईप गळती झाली असून, त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने शहरातील नागरिकांना पाण्याअभावी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

नळाला पाणी येत नसल्याने शहरातील महिलांना भर उन्हातून दूर बोअरिंगवरून डोक्यावर हंड्याने पाणी आणावे लागत आहे. तर काही नागरिकांना नाईलाजाने विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. तळा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर होऊनही प्रशासनाच्या नियोजनशून्यतेमुळे तळा शहराचा विकास पूर्णतः खुंटला असल्याचा आरोप जनतेतून करण्यात येत आहे. पाणी नियोजनाची जबाबदारी असलेल्या यंत्रणांमधील बेफिकिरी, समन्वयाचा अभाव, नियोजनाचा अभाव आणि पाण्याच्या पर्याय शोधाकडील दुर्लक्ष केल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

वावे धरणातून तळा शहरासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आलेली आहे, परंतु मंजूर झालेल्या कामांचे केवळ बॅनर लावण्यातच धन्यता मानण्यात आले असल्याचे बोलले जात आहे. योजनेचे काम अजूुुन सुरु झालेले नाही. सध्या सुरु असलेल्या पाणीपुरवठा योजनेत काहीना काही सतत बिघाड होत असतो, हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी आज किती खर्च केला जातोय याबाबतही आता सर्वसामान्यांकडून शंका उपस्थित केली जात आहे.

Exit mobile version