टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्याच्या आदिवासी भागात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे आदिवासी भागातील लोकांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे आदिवासी समाज संघटनेच्या वतीने पाणीटंचाई स्थिती उद्भवलेल्या वाड्याना टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे. आदिवासी समाज संघटनेच्या वतीने कर्जत तहसीलदार आणि कर्जत पंचायत समितीकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कर्जत तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून, या तालुक्यात एप्रिल महिना सुरू झाल्यानंतर पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होते. आदिवासी भागातील पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी नळपाणी योजना राबविल्या आहेत. मात्र, अनेक नळपाणी योजना बंद स्थितीत आहेत तर नवीन पाणी पुरवठा योजनेची कामे अपूर्ण स्थितीत आहेत. त्यामुळे अशा आदिवासी वाडी वस्तीवर पिण्याच्या पाण्याचे अडचणी निर्माण झाल्या आहेत. मोग्रज विभाग रेल्वे पट्टा, नेरळ विभाग, कशेळे विभाग, कळंब विभाग आदी भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याचे आदिवासी विभागाने नमूद केले आहे.
आदिवासी संघटनेने तालुक्यातील नळ पाणी योजनेची अपूर्ण असलेली कामे तातडीने पूर्ण करावी. बंद स्थितीत असलेल्या नळपाणी योजना सुरळीत कराव्यात, तसेच पाणी टंचाई भागात तातडीने टँकरने पाणी पुरवठा सुरु करावा. बंद असलेल्या आणि अपूर्ण असलेल्या नळपाणी योजना यांची कामे जलदगतीने पूर्ण व्हावीत अशी आदिवासी संघटनेने मागणी केली आहे. टँकरने पाणी पुरवठा करावा अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल. तसेच, कर्जत पंचायत समिती आणि तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा काढला जाईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग कर्जत आणि कर्जत पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना आदिवासी समाज संघटनेच्या वतीने देण्यात आले. त्यावेळी आदिवासी समाज संघटनेचे अध्यक्ष परशुराम दरवडा, अक्षय तिटकारे, जयवंती हिंदोळा, भगवान भगत, मनोहर ढुमणे, मोहन वारघडा, बबन शेंडे, काशिनाथ पादीर, लक्ष्मण उघडे, काशिनाथ उघडे, हिरू निरगुडा, ऋषी पुंजारा, परशुराम थोराड आदी उपस्थित होते.







