दिघी येथील घरात शिरले पाणी


महामार्गाच्या अर्धवट कामांमुळे रहिवाशांना त्रास
। श्रीवर्धन । वार्ताहर ।
दिघी येथे माणगांव-दिघी पोर्ट महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र, ठेकेदाराकडून पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण न केल्याचा फटका हा येथील रहिवाशांना बसला आहे. जोरदार पावसामुळे मातीयुक्त पाणी थेट घरात घुसल्याने ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत.

माणगाव पासून दिघी पोर्टपर्यंत रस्ता हा काँक्रीटीकरण होत आहे. टप्प्याटप्प्याने काम पूर्ण करत हे दिघी पोर्टपर्यंत जात आहे. गावाच्या भौगोलिकदृष्ट्या रचनेमुळे गावालगत भिंत बांधण्याचे ठरवण्यात आले. त्यासाठी माती वगैरे आणण्यात आली. मात्र, काम अर्धवट राहिले आणि पाऊस जोरदार सुरू झाल्याने पाणी व माती थेट घरात आले. त्यामुळे येथील रहिवाशांचे फार हाल झाल्याचे पाहायला मिळाले. तर वेळास गाव ते दिघी मार्गावर रस्त्याचे काम पूर्ण न झाल्याने सर्वत्र चिखलयुक्त रस्त्यावर घसरगुंडी तयार झाली आहे. मुख्यतः दिघीहुन नानवली मार्गावर रस्त्यावर चिखल वाढल्याने अनेक छोट्या अपघाताच्या घटना समोर येत आहेत.

दिघी गावातून पोर्टकडे जाणार्‍या रस्त्याच्या अर्धवट कामामुळे येथील ग्रामस्थांना समस्याने ग्रासले आहे. रस्त्यामुळे पाईपलाईनचे नुकसान झाल्याने पर्यायी टँकरने पाणी पुरवठा करण्याचे दिलेल्या अश्‍वासनाकडे ठेकेदाराकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे. पाईपलाईनची दुरुस्ती वेळेत करून येथील सुविधा पूर्ववत कराव्यात अशी मागणी आम्हा दिघी ग्रामस्थांची आहे.

– किरण कांदेकर, दिघी कोळी समाज अध्यक्ष.

Exit mobile version