काही भागांत एक दिवसाआड पाणीपुरवठा
| पनवेल | प्रतिनिधी |
नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील सिडकोच्या कार्यक्षेत्रात पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी सिडको प्रशासनाने नोडनिहाय पाणी कपातीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या निर्णयामुळे खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, उलवे, तळोजा, करंजाडे आणि द्रोणागिरी परिसरातील नागरिकांना फटका बसणार आहे.
सिडकोने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, दर आठवड्याला 24 तासांची नियोजित पाणी कपात करण्यात येणार आहे. त्यानुसार खारघर आणि नवीन पनवेल पूर्व येथे सोमवारी, उलवेच्या काही सेक्टरमध्ये मंगळवारी, नवीन पनवेल पश्चिम येथे मंगळवारी, कळंबोली येथे बुधवारी, करंजाडे येथे गुरुवारी, तर तळोजा, कळुंद्रे आणि कामोठे येथे शुक्रवारी पाणी कपात राहणार आहे. दरम्यान, उलवे परिसरातील सेक्टर 8, 9, 10 बी, 15 सी, 16, 17 आणि 18 यांसह शेलघर, बामणडोंगरी, न्हावा, शिवाजीनगर आणि न्हावा खाडी परिसरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. द्रोणागिरी परिसरातील विविध सेक्टर तसेच धुतुम, भेंडखळ, पागोटे, नवघर, नवघर पाडा, बोकडवीरा आणि कुंडे या गावांनाही या नियोजनाचा फटका बसणार आहे. पाणीकपातीमुळे नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता लक्षात घेता, नागरिकांनी आवश्यकतेनुसार पाण्याचा साठा करून ठेवावा, पाण्याचा अपव्यय टाळावा आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन सिडको प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
