पनवेल महापालिका प्रशासन सज्ज
| पनवेल । वार्ताहर ।
पनवेल पालिका क्षेत्रातील ग्रामीण भागापर्यंत पालिकेची आरोग्य वैद्यकीय सेवा पोहाचावी यासाठी पालिका प्रशासन ग्रामीण भागात जागा भाड्याने घेणार आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने यासाठी जागेची चाचपणी सुरू केली असून गावातील नागरिकांना खेड्यातच वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी हे नियोजन केले आहे.
पालिका हद्दीत सध्या 6 विविध आरोग्य केंद्र आहेत. शहरातील गावदेवीपाडा येथील महाराष्ट्र व्यायामशाळेसमोर, कोळीवाडा येथील अभिदीप सोसायटीत, नवीन पनवेल येथील बांठिया शाळेजवळील समाजमंदिरात, कळंबोली येथील गुरुव्दारासमोर, खारघर येथील सेक्टर 15 मधील अयप्पा मंदिराजवळ, कामोठे येथील सेक्टर 8 मधील एनएनआर शाळेच्या पाठीमागे येथे ही आरोग्य केंद्र सुरू आहेत. सहा वर्षे पालिकेच्या स्थापनेनंतर लोकसंख्येनुसार या परिसरात अजून 9 आरोग्य केंद्र सुरू करण्यासाठी पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. मात्र जागे अभावी ही सर्वच आरोग्य केंद्र सुरू करणे अशक्य असल्याने तसेच ग्रामीण पनवेलमध्ये आरोग्य केंद्र तातडीने सुरू करण्याचे आदेश पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी वैद्यकीय आरोग्य विभागाला दिले. यानुसार पालिकेचे आरोग्य विभागाचे प्रमुख उपायुक्त सचिन पवार आणि पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. रेहना मुजावर यांनी शहरीवस्तीसह खेड्यांमध्ये आरोग्य केंद्र सुरू करण्यासाठी विविध जागांची पाहणी केली.
पालिकेने केलेल्या जागेच्या नियोजनानुसार चार ठिकाणी पालिकेच्या मालकीच्या जागेवर आरोग्य केंद्राची उभारणी करणार आहे. यामध्ये पूर्वाश्रमीच्या भिंगारी व कळंबोली ग्रामपंचायत कार्यालय, पालेखुर्द ग्रामपंचायत कार्यालय, खारघर व रोहींजण या जागा निश्चित केल्या आहेत. तसेच पालिका इतर पाच वेगवेगळ्या जागा भाडेतत्त्वांवर घेऊन तेथे आरोग्य केंद्र सुरू करणार आहे. यामध्ये खांदा कॉलनी व नवीन पनवेलकरांना सोयीचे ठिकाण पालिका शोधात आहे. खारघर सेक्टर 36 येथे, तळोजा फेस 1 येथे, कामोठे सेक्टर 34 येथे तसेच कामोठे वसाहतीमधील सेक्टर 20 ते 22 या परिसरातील जागा भाडेतत्त्वांवर घेण्याचा पालिका विचाराधीन असल्याची माहिती उपायुक्त सचिन पवार यांनी दिली. आरोग्य केंद्रासाठी हजार चौ. फुटांपेक्षा अधिकचे क्षेत्रफळ लागणार आहे. पालिका नऊ नवीन आरोग्य केंद्राव्यतिरिक्त टेंभोडे, तळोजा पाचनंद, कोयनावेळे, पडघे, खारघर (समाजमंदिर सेक्टर 12) आसूडगाव (समाजमंदीर) येथे वेलनेस सेंटर सुरू करणार आहे. यामध्ये दिवसभर पालिकेचा दवाखाना दिवसा सुरु राहील. यामुळे गावकर्यांनाही आरोग्याच्या सुविधा मिळतील, असे पनवेल पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले.