। तळा । वार्ताहर ।
द.ग.तटकरे महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे कर्नाळा येथे हिवाळी संकल्प शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत असून श्रमदान उपक्रमांतर्गत महाविद्यालयाचे विद्यार्थी व कर्नाळा ग्रामस्थ यांनी मिळून या ठिकाणी वनराई बंधारा बांधला. येथील पशुपक्षी व गुरांना पाण्याची सोय उपलब्ध व्हावी तसेच जमिनीची धूप रोखली जावी या हेतूने हा वनराई बंधारा बांधण्यात आला. विद्यार्थ्यांना श्रमदानाचे महत्व समजावे तसेच गावातील ग्रामस्थ कशाप्रकारे कष्ट करतात याची माहिती व्हावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे शिबीर प्रमुख डॉ.दिवाकर कदम व डॉ.राजाराम थोरात यांनी सांगितले. याप्रसंगी महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच कर्नाळा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.