ऐन पावसाळ्यात भवानीपाड्यात पाणी टंचाई

जलजीवन मिशन नळपाणी योजना; वर्षापासून नळाला पाणीच नाही

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील ओलमन ग्रामपंचायतीमधील बोरगाव गावच्या हद्दीत नव्याने वसलेल्या भवानीपाडा गावामध्ये ऐन पावसाळ्यात पिण्याचे पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. नळपाणी योजना सुरू झाल्याची घोषणा झाली पण वर्षभरात एक थेंब पाणीदेखील नळाला आलेले नाही. दरम्यान, कर्जत तालुका पाणी पुरवठा विभाग देखील याबाबत कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करीत नसल्याने ग्रामस्थ हैराण आहेत.

भवानीपाडा हे 40 घरांची लोकवस्ती असलेले गाव कळंब बोरगाव रस्त्यावर आहे. उंबरखांड गावाच्या अलिकडे असलेल्या या गावासाठी जलजीवन मिशन मधून नळपाणी योजना राबवली आहे. तेथे असलेल्या बोअरवेलमधून पाणी उचलून एका सीनटेक्स टाकीमधून टाकण्याची ही योजना आहे. तेथून ते पाणी पुढे गावात असलेल्या सार्वजनिक स्टँड पोस्ट आणि घरोघरी जोडलेल्या नळांना देण्याची ही योजना आहे.

या योजनेचे काम पूर्ण झाल्याचे ओलमन ग्रामपंचायत कडून जाहीर झाले असून, त्याला एक वर्षे पूर्ण झाले. मात्र, या वर्षभरात बोअरवेलमधील पाणी काही भवानीपाडा ग्रामस्थांचे घरी असलेल्या नळाला पोहचले नाही. त्यामुळे उन्हाळ्यात नाहीतर पावसाळ्यात नळाला पाणी येईल अशी ग्रामस्थांना अपेक्षा होती. परंतु उन्हाळ्यात काय? सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात देखील भवानीपाडा येथील नळ कोरडेच आहेत.

ग्रामस्थांच्या या वर्षभर सुरू असलेल्या त्रासाबद्दल स्थानिक ग्रामस्थ राजेश खडेकर यांनी संताप व्यक्त केला आहे. नळपाणी योजना सुरू होऊन नऊ दहा महिने झाले पण घरात पाण्याचा थेंब आला नाही. तर दुसरीकडे नळाचे पाणी साठवण्याची टाकी ज्या ठिकाणी आहे तेथे ती टाकीला पावसाळ्यात उगवलेल्या गवताने जंगली झाडांनी वेढा घातला आहे. तर उन्हाळ्यात बोअरवेल कोरडी असेल तर पावसाळ्यात पाणी मिळेल अशी अपेक्षा असलेल्या स्थानिक ग्रामस्थांना पावसाळ्यात देखील पाणी मिळाले नाही. त्यामुळे नळाचे पाणी काही भवानीपाडा ग्रामस्थांच्या घशाखाली गेलेले नाही. अद्याप नळाचे पाणी मिळाले नसल्याने ग्रामस्थ संतप्त असून आपली व्यथा ग्रामस्थांनी कर्जत येथे जाऊन पाणी पुरवठा विभागाचे अभियंता यांच्या कानावर घातली. त्यावेळी बघतो पाहतो अशी उत्तरे अभियंत्यांनी दिली असून ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रकार जिल्हा परिषदेचे कर्जत पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी करीत आहेत.

ग्रामस्थांची पाण्याची तहान आता पावसाळ्यात पडणाऱ्या पावसाचे पाणी पागोळी म्हणुन गोळा करावे लागत आहे. शासनाने या योजनेची चौकशी करावी अशी आमच्या ग्रामस्थांची मागणी आहे.

राजेश खडेकर
ग्रामस्थ
Exit mobile version