खारघर, कळंबोली, तळोजातील पाणीटंचाईचे संकट गहिरे
| पनवेल | प्रतिनिधी |
तळोजा, कळंबोली आणि खारघर या सिडको वसाहतींमध्ये पिण्याचे पाणी केवळ काही मिनिटेच मिळत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. उन्हाळ्यात ही पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त होत आहे. नवी मुंबई महापालिकेने सिडकोला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात केल्यानंतर पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडको वसाहतींचे नियोजन विस्कळीत झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
कळंबोलीला प्रतिदिन 30 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी आवश्यक असताना प्रत्यक्षात 22 एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. खारघरला 85 एमएलडीची आवश्यकता असून सध्या 75 एमएलडी पाणी मिळत आहे. सर्वाधिक बिकट परिस्थिती तळोजामध्ये असून, 22 एमएलडीची गरज असताना केवळ 8 एमएलडी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गणेशोत्सवात घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी पाण्याची व्यवस्था कशी करावी, हा प्रश्नही नागरिकांसमोर आहे.
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवेंद्र मढवी यांनी सांगितले की, पनवेल महापालिकेतील अनेक गावांना पिण्यासाठी बोअरवेलच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे, ही ग्रामीण भागाची शोकांतिका आहे. तसेच महापालिका कर वसूल करत असलेल्या खारघर सारख्या शहरीभागात सिडकोने बांधलेल्या स्वप्नपूर्ती गृहनिर्माण संस्थेत रविवारी खंडित केला जाणारा पाणीपुरवठा मंगळवारी पुर्ववत केला जातो. तसेच खारघरमधील सेक्टर 20 येथे दीड ते दोन तासच पाणीपुरवठा होतो. अजूनही महापालिकेतील गाव आणि शहरी परिसरात नागरिक वैतागले आहेत.
पनवेलची तहान भागविण्यासाठी भविष्यात शिलार धरणातून पाणी घेण्याचे नियोजन असून त्यासाठी अद्याप चार वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे. पाताळगंगा नदीतून अतिरिक्त पाणी आणणारी जलवाहिनी तीन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र साडेपाच वर्षे उलटूनही पनवेलमध्ये ती पोहोचलेली नसल्याने पाणीसंकट अधिक गंभीर बनले आहे. पनवेल महापालिका आणि सिडकोने हे पाणीसंकट मिटेपर्यंत टँकरने मोफत पाणी द्यावे. तसेच पुरेसा पाणीपुरवठा होईपर्यंत नवीन घरांची बांधकामे थांबवा, भोगवटा प्रमाणपत्र देऊ नका अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने होत आहे.
पाणीपुरवठा व्यवस्थेच्या हस्तांतरणासाठी प्रयत्न
खारघर व कामोठे येथील पाणीपुरवठा व्यवस्था सिडकोकडून पनवेल महापालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक अभ्यास सुरू असून, त्यासाठी सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे, अशा माहिती पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी दिली. क्षेत्रीय पाहणी करून आवश्यक कागदपत्रे व आराखडे उपलब्ध करून देण्याबाबत सिडकोला कळविण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. नवी मुंबई महापालिकेने 25 मेपासून 10 टक्के पाणीकपात लागू केल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोरबे धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात करू नये, अशी मागणी महापालिकेने केली आहे. अपुऱ्या पाणीपुरवठ्यावर तातडीने उपाय म्हणून सिडको मंडळाच्या तसेच गावठाण क्षेत्रासाठी महापालिकेने 10 टँकरचे नियोजन केले आहे. खारघर, ओवे गावासह अन्य गावांमध्ये या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
नवी मुंबई महापालिकेने पाणीकपातीमध्ये काही प्रमाणात सवलत दिली आहे. मात्र, पाणीपुरवठ्यात अद्याप वाढ होणे आवश्यक आहे. यासाठी सिडको मंडळाकडून नवी मुंबई महापालिकेकडे सातत्याने पाणीपुरवठा वाढविण्याची मागणी करण्यात येत आहे.
– डॉ. राजा दयानिधी, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको मंडळ
गणेशोत्सव सुरू असताना पाणी येत नसल्याने तळोजातील नागरीक हैराण झाले आहेत. नागरिकांनी तीन आंदोलने केली तरीही प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचे डोळे उघडत नाहीत, ही शोकांतिका आहे. आता हंडे घेऊन आम्ही खारघर येथील महापौर बंगल्यापासून दौड करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेऊ त्याशिवाय ही मंडळी जागी होणार नाहीत.
– हरेश केणी, नगरसेवक,
काँग्रेस पक्ष
प्रशासकीय अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांनी नेमके कोणत्या प्रकल्पांना प्राधान्य द्यायला पाहीजे याचा अगोदर अभ्यास केला पाहिजे होता. अनेक वर्षे सत्तेत असूनही पनवेलकरांसाठी स्वतंत्र धरण उभारण्याला प्राधान्य न दिल्याने ही वेळ आली आहे. पाण्याची कमतरता असतानाही नवीन बांधकामांना परवानग्या व भोगवटा प्रमाणपत्रे दिल्याने भविष्यातील पाणी संकट वाढणार आहे. गणेशोत्सवानंतर सिडकोला याबाबत जाब विचारण्यात येईल.
– बबन पाटील, जिल्हा सल्लागार, शिवसेना (उद्धव ठाकरे)
