दोन वाड्या, तीन गावांना सरकारी टँकरने पाणी
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात पिण्याची पाण्याची टंचाई उन्हाळा सुरू झाला की तात्काळ जाणवू लागते. दरवर्षी खासगी टँकरच्या माध्यमातून पाणीटंचाईग्रस्त भागात पाणीपुरवठा होत असतो. यावर्षी निवडणूक आचारसंहिता असल्याने राजकीय पक्षांना पिण्याच्या पाण्याची सुविधा पुरविण्यात अडचणी येत आहेत. मात्र, पाणीटंचाई वाढू लागल्याने यावर्षी टंचाईग्रस्त भागातील जनतेचे हाल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तालुक्यातील तीन गावे आणि दोन आदिवासी वाड्यांना सरकारी टँकरच्या माध्यमातून पिण्याचे पाणी पुरवले जात आहे.
सध्या कर्जत तालुक्यात शासनाच्या एका टँकरमधून पिण्याचे पाणी टंचाईग्रस्त भागाला पुरविले जात आहे. एप्रिल महिना सुरू झाल्यानंतर स्थानिक ग्रामपंचायतीच्या मागणीनंतर आशाने गावासाठी पहिला टँकर शासनाकडून सुरू करण्यात आला होता. त्यानंतर कर्जत तालुक्यातील सर्वात जास्त पाणीटंचाई समस्या जाणवणार्या मोग्रज ग्रामपंचायतीकडून चार ठिकाणी पिण्याचे पाणी टँकरच्या माध्यमातून पुरविण्यात यावे, अशी मागणी ग्रामपंचायतीकडून करण्यात आली. त्यानुसार कर्जत पंचायत समितीच्या पाणीटंचाई निवारण पथकाने तेथील परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर मोग्रज ग्रामपंचायतीमधील धामणी, पिंगळस आणि जांभूळवाडी या तीन ठिकाणी ट्रँकरच्या माध्यमातून पिण्याचे पाणी पुरविण्यात येऊ लागले आहे. सध्या कर्जत पंचायत समितीकडे पाणी टंचाईग्रस्त भागात पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी केवळ एक टँकर जिल्हाधिकार्यांनी मंजूर केला आहे. सध्या त्या टँकरच्या माध्यमातून एक आदिवासी वाडी आणि तीन गावे या ठिकाणी पिण्याचे पाणी पुरवले जात आहे.तर कर्जत पंचायत समितीकडे मोग्रज ग्रामपंचायतीमधील मेचकर वाडीमधील पिण्याच्या पाण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. तेथील पाहणी भूजल सर्वेक्षणकडून अहवाल आल्यावर शुक्रवारी (दि.12) एप्रिल रोजी तेथेदेखील टँकरमधून पिण्याचे पाणी देण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे यांनी दिली आहे.
मोग्रज ग्रामपंचायतीमधील खानंद आणि भक्ताची वाडी येथील प्रस्ताव कर्जत पंचायत समितीकडे पोहोचले आहेत. तेथे तालुक्यातील सर्वाधिक पाणीटंचाई उद्भवली असल्याने शासनाच्या जलजीवन मिशनमधील नळपाणी योजनांचे काय झाले, असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे.