चिपळूणमधील अनेक गावात पाणीटंचाई; खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा
। चिपळूण । प्रतिनिधी ।
चिपळूण तालुक्यातील पाणीटंचाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. काही धरणांच्या दुरुस्तीची कामे रखडल्याने या भागातील 15 हून अधिक गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. केवळ एका खासगी टँकरच्या आधारे या भागात सहा गावांमध्ये पाणीपुरवठा केला जात आहे. उर्वरित गावांना टँकरची मागणी करूनही ते वंचित आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत येथे पाणीटंचाईची आणखी गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
चिपळूण तालुक्याच्या प्रत्येक डोंगरखोर्यात धरण आहे. त्यातून दसपटी, डेरवण, खाडीपट्टा या भागात सहजपणे सर्व गावांची तहान भागेल या पद्धतीने धरणाचे जाळे तयार झाले आहे. मात्र, यातील मालघर, कळवंडे, खोपड, कामथे फणसवाडी, असुर्डे, आंबतखोल, अडरे, मोरवणे ही धरणे अनेक वर्षे जुनी असून, लघु पाटबंधारे योजनेअंतर्गत त्याच्या भिंती दगड मातीच्या पिचिंगने उभारलेल्या आहेत. या धरणांना जागोजागी गळती लागली असल्याने त्याची पाणी साठवण क्षमता काही अंशी कमी झाली आहे. विशेषतः कळवंडे व डेरवणच्या धरणाला मोठे दरुस्तीचे काम निघाले असल्याने त्याचा फटका या भागातील गावांना बसत आहे.
डेरवण हद्दीतील सावर्डे, डेरवण खुर्द, दुर्गेवाडी या गावांना, तसेच कळवंडे धरणामुळे कळवंडे, पाचाड, कोंढे, मिरजोळी आदी गावांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. सन 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीत तालुक्यातील दसपटी तिवरे धरण फुटले. तेव्हापासून या विभागातील बहुतांशी गाव पाणीटंचाईचा सामना करत आले. मात्र, आता नवीन ग्रॅव्हिटी पाणी योजनेमुळे या भागातील काही गावांची तहान भागली आहे. मात्र, अजूनही धनगर वाड्यांची समस्या सुटलेली नाही.
चिपळूण तालुक्यात यापूर्वी शासकीय टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, गेली काही वर्षे केवळ एका खासगी टँकरने भाडेतत्त्वावर टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणीपुरवठा केला जात आहे. एका टँकरने सेवा देताना संबंधित यंत्रणेला तितक्याच अडचणी येत असून, प्रत्येक गावात डोंगरदर्यातील गावांमध्ये पोहोचताना तारांबळ उडते आहे.
टँकरअभावी पाणीपुरवठा करण्यात अडचण
सद्यःस्थितीत टेरव धनगरवाडी, अडरे, कोंडमळा, सावर्डे, कुडप व अनारी येथील धनगरवाडांमध्ये 3 एप्रिलपासून टॅकरने पाणीपुरवठा केला जात आहे. याव्यतिरिक्त नारदखेरकी, कोसबी, करंबवणे, पाचाड, डेरवण, कादवड, कामथेखुर्द या गावांमधूनही टँकरची मागणी मागणी करण्यात आली आहे. मात्र, टँकरअभावी पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत.
ग्रॅव्हिटी पाणी योजनेची प्रतीक्षा
चिपळूण शहरात कोळकेवाडी धरणातून ग्रॅव्हिटी योजना राबविण्यात येत आहे. याच धर्तीवर तालुक्यातील पूर्व विभाग, सावर्डे, डेरवण, तसेच खाडीपट्टा विभागासाठी ग्रॅव्हिटी पाणी योजना राबविण्यात येणार आहे. त्याची प्रतीक्षा सर्वांनाच लागून राहिली आहे.