नवी मुंबई शहरात पाणीकपात

मोरबे धरणात फक्त 37.94 टक्के जलसाठा

| नवी मुंबई | प्रतिनिधी |

नवी मुंबईकरांची तहान भागविणार्‍या मोरबे धरण क्षेत्रात गेल्या वर्षी गरजेपेक्षा कमी पावसाची नोंद झाल्याने मोरबे धरण पूर्णपणे भरले नव्हते. दिवसेंदिवस नवी मुंबई शहरातील पाण्याचा वापरही वाढत असून धरण पूर्ण भरले नसल्याने अल निनो समुद्र प्रवाह सक्रियतेच्या प्रभावामुळे या वर्षीही पाऊस लांबणार असल्याचा व तसेच पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्यामुळे पालिकेने 28 एप्रिलपासून विभागवार एक दिवस संध्याकाळचा पाणीपुरवठा न करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे विभागवार एक दिवसाच्या पाणीकपातीमुळे दिवसाला सरासरी 25 दशलक्ष लीटर पाण्याची बचत होत असल्याचे दिसून आले आहे. परंतु तरीदेखील धरणात असलेल्या कमी जलसाठ्यामुळे नागरिकांनी पाण्याचा अत्यंत जपून वापर करून अधिकची पाणीकपात टाळण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

शहराला पाणीपुरवठा करणार्‍या मोरबे धरणात दिवसेंदिवस पाणीवापरामुळे पाणीसाठा कमी होतोय. धरणात अवघा 37.94 टक्के पाणीसाठा असून पुढील 95 दिवस तो पुरेल एवढाच शिल्लक आहे. पालिकेने मागील काही दिवसांपासून विभागवार पाणीपुरवठ्यात संध्याकाळच्या एका वेळेचे पाणीकपात केल्यामुळे दिवसाला 25 एमएलडी कमी पाणी धरणातून घ्यावे लागत आहे. 5 ऑगस्टपर्यंत पुरेल इतकाच पाण्यासाठा मोरबे धरणात उपलब्ध आहे. सध्या शहरात सुरू असलेली पाणीकपात आणखी वाढू द्यायची नसेल तर प्रत्येकाने पाणी जपून वापरायला हवे, यंदाही पाऊस हात आखडता घेणार असल्याची चिन्हे असल्याने जपून पाणी वापरायला हवे. सन 2021-22 मध्ये मोरबे धरणात 4229 मिमी पावसाची नोंद झाली तर सन 2022-23 मध्ये 3572 मिमी पाऊस पडला होता. स्वतःच्या मालकीचे धरण असलेली जलसंपन्न महानगरपालिका अशी ओळख आज नवी मुंबई शहराची आहे. शहरात पाणीकपातीला सुरुवात झाली असून आगामी काळात अधिक पाणीकपात टाळण्यासाठी नवी मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Exit mobile version