नेरळची पाणीटंचाई कायम

भूमीपूजन होऊन वर्षे लोटले तरीदेखील एकाही जलकुंभाचे बांधकाम नाही

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ ग्रामपंचायत हद्दीसाठी 40 कोटींची नळपाणी योजना यांचे भूमीपूजन जून 2023मध्ये झाले होते. मात्र, या नळपाणी योजनेच्या कामाचा अवधी केवळ सहा महिने शिल्लक राहिले आहेत. परंतु, नळपाणी योजनेमधून बांधण्यात येणारे चारही जलकुंभांचे काम जेमतेम पाच टक्के झाले आहे. दरम्यान, नेरळ नळपाणी योजनेचे काम करणार्‍या ठेकेदार कंपनीकडून कोणत्याही प्रकारचे काम पुढे जात नसल्याने नेरळ गावामध्ये आलेली पाणीटंचाई किमान वर्षभर राहण्याची शक्यता आहे.

नेरळ ग्रामपंचायत भागासाठी जलजीवन मिशनमधून 40 कोटींची नळपाणी योजना मंजूर झाली आहे. या नळपाणी योजनेचे भूमीपूजन आमदार महेंद्र थोरवे आणि प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते जून 2023 रोजी करण्यात आले होते. या योजनेच्या कामासाठी दीड वर्षाची मुदत असून, ती संपण्यास आता फक्त सहा महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. या योजनेमध्ये चार ठिकाणी जलकुंभ नव्याने बांधले जाणार असून, जुन्या नळपाणी योजनेमधील मोहाची वाडी येथील एक जलकुंभ नवीन योजनेतदेखील वापरात राहणार आहे. योजनेचे बांधकाम सुरू होऊन किमान वर्षे पूर्ण झाले आहे. मात्र, या योजनेमधील एकाही जलकुंभाचे बांधकाम पूर्ण झालेले नाही. नेरळ प्रादेशिक नळपाणी योजनेत जलकुंभ बांधले जाणार असलेल्या ठिकाणी टेप आळी येथील बांधकाम वनजमिनीमध्ये वादात सापडले आहे. तर, आनंद वाडी येथील जलकुंभ बांधकामासाठी जमीन देणार्‍या जमीन मालकाने वर्षभर कामे सुरू केली जात नसल्याने आता जमीन देण्यासाठी असहमती दर्शवली आहे. त्याचवेळी जुम्मापट्टी येथे जलकुंभ बांधण्यासाठी जमीन देणार्‍या महिला शेतकर्‍यांनीदेखील आपल्या जमिनीवर कोणतेही अतिक्रमण होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

नेरळ प्रादेशिक नळपाणी योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पूर्ण केले जाणार आहे. या योजनेत मोहाची वाडी येथे साडेबारा लाख लीटर तसेच आनंद वाडी, जुम्मापट्टी आणि टेपआळी अशा चार ठिकाणी जलकुंभ उभारले जाणार आहेत. नवीन योजनेच्या कामाचे भूमीपूजन करताना जून 2023 मध्ये जुन्या भुस्तर पाण्याची टाकी तोडण्यात आली. त्याच ठिकाणी साडेबारा लाख लीटर क्षमतेचे नवीन जलकुंभ बांधण्यास सुरुवात झाली. मात्र, खोदकामाशिवाय तेथील जलकुंभाचे काम पुढे सरकू शकले नाही. वर्ष लोटले तरी या मोहाची वाडीमधील सर्वात जास्त लीटर क्षमतेच्या जलकुंभ बांधण्याचे काम एक टक्कादेखील पुढे लोटले नाही. त्याचा परिणाम नेरळ गावात जून 2023 मध्ये सुरू असलेली पाणीटंचाई एक वर्षानंतरदेखील कायम आहे. सध्या नेरळ गावात बहुसंख्य भागात पाणीटंचाईला स्थानिक जनतेला सामोरे जावे लागत आहे. मात्र, आजही त्या जलकुंभ बांधण्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही आणि त्यामुळे नेरळ गावातील पाणीटंचाई आणखी काही महिने वाढणार आहे. मोहाची वाडी येथील जलकुंभ बांधण्यात येणार आहे,ती जमीन आमची असल्याचा दावा स्थानिक कातकरी समाजाने केला आहे.तर त्या जमिनीचा सातबारा ज्या ठाकूर समाजाचे नावे आहे, त्या ठाकूर समाज संघटना यांनीदेखील तेथे जलकुंभ बांधण्यास विरोध केला आहे. त्याबाबत कर्जत तालुका आदिवासी ठाकूर संघटना यांनी नेरळ ग्रामपंचायतीमध्ये येऊन आमच्या हक्काच्या जमिनीवर आणखी अतिक्रमण होऊ देणार नाही, असा दावा केला.

नेरळ प्रादेशिक नळपाणी योजनेच्या जलकुंभ बांधण्याच्या कामासाठी ठेकेदार कंपनीकडून कोणत्याही प्रकारचे योगदान स्थानिक पातळीवर कामे करण्यासाठी दिसून येत नाही. त्यामुळे नेरळ गावावर आलेली पाणीटंचाईची स्थिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या निष्क्रियता आणि दिरंगाई यामुळे पिण्याचे पाण्यासाठी स्थानिक रहिवाशांना दररोज विकत पाणी घ्यावे लागत आहे. नेरळमधील पाणीटंचाई कमी करण्यासाठी नवीन जलकुंभ बांधून पूर्ण होणे गरजेचे आहेत. स्थानिक आदिवासी कार्यकर्त्यांनी नेरळ ग्रामपंचायतीमध्ये येऊन सरपंच उषा पारधी, उपसरपंच मंगेश म्हसकर, सदस्य संतोष शिंगाडे, प्रथमेश मोरे, नितीन निरगुडे, उमा खडे, गीतांजली देशमुख, श्रद्धा कराळे यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली. त्यावेळी योजनेचे काम पुढे वेगाने व्हावे यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे पत्र देण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी अरुण कार्ले यांनी आदिवासी ग्रामस्थांना दिली.

Exit mobile version