डवर्यातील पाणी पिण्याची ग्रामस्थांवर वेळ
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यात खांडस ग्रामपंचायतमधील चाफेवाडी सह अन्य दोन आदिवासी वाडीमध्ये पाणी टंचाईचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. तीन आदिवासी वाद्यांमधील महिलांवर उन्हाळयात कोरड्या असलेल्या नदीमध्ये डवरे खोदण्याची वेळ आली आहे. दरम्यान, चाफेवाडी, पादीर वाडी आणि वडाची वाडी येथील आदिवासी महिलांवर चिल्हार डवर्यातील पाणी भरून घरी नेण्याची वेळ आली आहे. दरम्यान, त्या तिन्ही वाड्यांमध्ये शासनाच्या टँकरचे पाणी पोहचत असून देखील पाण्याची तहान भागविण्यासाठी नदीमध्ये डवरे खोदण्याची आणि त्यातील पाणी पिण्याची वेळ आली आहे.
खांडस ग्रामपंचायतमधील आदिवासी वाड्या पाणीटंचाई ग्रस्त वाड्या आहेत. शासनाच्या जलजीवन मिशनमधून राबविण्यात आलेली नळ पाणी योजनेचे पाणी गेली तीन महिने सोडले जात नसल्याने येथील आदिवासी महिलांना पाण्यासाठी मोठी कसरत करीत नदी पात्रात यावे लागत आहे. वडाची वाडी, चाफेवाडी आणि पादीर वाडीतील आदिवासी लोकांना नळाचे पाणी मिळत नाही. त्यामुळे या तिन्ही आदिवासी वाड्यांमधील महिला या चिल्हार नदीवर पिण्याचे पाणी नेण्यासाठी येतात. चिल्हार नदीत काही जाणकारांच्या सल्ल्याने डवरे खोदण्यात आले आहेत. त्यातील एका डवर्यात भरपूर पाणी असून साधारण 120 घरांची वस्ती असलेल्या तिन्ही आदिवासी वाडीतील लोकांना पुरेसे ठरत आहे.
दुसरीकडे शासनाकडून या तिन्ही वाड्यांना शासकीय टँकरमधून पाणी पुरविले जाते. मात्र, स्थानिक आदिवासी लोकांना डवर्यातील पाणी स्वच्छ वाटते. कारण टँकरमधून येणारे पाणी दूषित तर नाही ना? अशी भीती आदिवासी लोकांना अधिक आहे. त्यामुळे या तिन्ही आदिवासी वाड्यांमधील आदिवासी लोकांचा विश्वास हा डवर्यातील पाण्यावर जास्त आहे. सकाळ पासून दिवसभर पाणी भरून देखील डवर्यामधील पाणी आटत नाही. त्याचवेळी आतापर्यंत त्या पाण्याने कोणालाही कसलीही बाधा झालेली नाही. मात्र, आमच्या दारात असलेल्या नळाला नळपाणी योजनेचे पाणी आले तर आम्ही कशाला नदीवर येऊ, असा प्रश्न ही आदिवासी उपस्थित करीत आहेत.
पाण्यासाठी कसरत वडाची वाडी, चाफेवाडी आणि पादीर वाडी या तिन्ही वाड्यांपासून चिल्हार नदीचे अंतर साधारण दीड किलोमीटर एवठे आहे. नदीवरील डवरे असलेल्या ठिकाणी येण्यासाठी घरातून रिकामे हांडे घेऊन येताना तीव्र उतार आहे. तर पाण्याने भरलेले हांडे घेऊन पुन्हा आपल्या वाडीत परत जाताना या महिलांना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे जेमतेम तीन हांडे घेऊन या महिला नदीवर येत असतात.
आमची मागील वर्षी सुरू झालेली नळपाणी योजनेचे काय झाले की नाही हे आम्हाला माहिती नाही. पाणी नळाला येत नसल्याने आम्हा सर्व महिलांना पिण्याचे पाणी घरापर्यंत नेण्यासाठी नदीवर यावे लागते. चिल्हार नदीत डवरे खोदून पाणी नेण्याची कसरत कधी थांबेल, असा आमचा सरकारला प्रश्न आहे.
नैना विठ्ठल पादीर, ग्रामपंचायत सदस्या