उल्हास नदीच्या तीरावरच पाणीटंचाई

चारही बोअरवेल नादुरुस्त

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रुप ग्रामपंचायतीमधील वावे गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, उल्हास नदीच्या तीरावर असलेल्या गावात पाणीटंचाईची परिस्थिती उद्भवली आहे. दरम्यान, गावातील चारही बोअरवेल नादुरुस्त झाल्याने आणि नवीन नळपाणी योजनेचे काम रखडल्याने वावे गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

150 घरांची वस्ती असलेल्या उमरोली ग्रामपंचायतीमधील वावे गावाच्या बाजूने उल्हास नदी वाहते. या नदीवर कर्जत तालुक्यातील अनेक गावांच्या नळपाणी योजना आहेत. मात्र, वावे गावासाठी नव्याने बनविल्या जात असलेल्या जलजीवन मिशनमधील नळपाणी योजनेचे उद्भव उल्हास नदीवर नाही. जलजीवन मिशनमधून मंजूर झालेल्या नळपाणी योजनेचे उद्भव पाली भुतीवली धरण आहे. त्या योजनेचे काम अर्धवट असून, केवळ जलवाहिन्या टाकून झाल्या आहेत. मात्र, त्या जलवाहिन्यादेखील जमिनीखाली टाकण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे गावात अस्तव्यस्त पडलेल्या जलवाहिन्या आजही वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. मात्र, गावात निर्माण झालेल्या पाणीटंचाईनंतरदेखील शासनाचे या गावाकडे लक्ष नाही. त्यामुळे पाण्याची स्थिती पाहण्यासाठी आलेल्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांना महिलांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. सध्या (दि.27) एप्रिलपासून ग्रामपंचायतीकडून पिण्याचे पाणी टँकर पाठवून पुरवले जात आहेत. नळपाणी योजनेचे काम जेमतेम झालेले असतानादेखील 20 लाखांचे बिल ठेकेदाराला अदा करण्यात आले असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप आहे.

बोअरवेल दुरुस्त करण्याची यंत्रणा कर्जत पंचायत समितीकडे असते. त्यामुळे त्यांनी या बोअरवेल दुरुस्त करून द्याव्यात आणि पाण्याची टंचाई दूर करावी.

गणेश धारणे,
ग्रामस्थ,
वावे

बोअरवेल दुरस्त करणारे कोणतेही कर्मचारी पंचायत समितीकडे नाहीत. मात्र, त्या बोअरवेल संबंधित ग्रामपंचायतीने दुरुस्त करून घ्यायच्या असतात. त्याचे बिल अदा करण्याच्या सूचना लघुपाटबंधारे विभागाला जिल्हा परिषदेने दिल्या आहेत. त्यामुळे तेथील ग्रामविकास अधिकार्‍यांनी बोअरवेल दुरुस्त करून घेण्याची कार्यवाही करावी.

चंद्रकांत साबळे,
गटविकास अधिकारी,
कर्जत पंचायत समिती
अधिकार्‍यांना महिलांचा गराडा
वावे गावातील पिण्याच्या पाण्याची टंचाई याबाबत माहिती मिळाल्याने पाहणी करण्यासाठी 4 मे रोजी लघुपाटबंधारे विभाग उपअभियंता सुजित धनगर, एक कनिष्ठ अभियंता आणि ग्रामविकास अधिकारी रतीलाल चौधरी हे गावात पोहोचले होते. त्यावेळी संतप्त महिलांच्या रोषाला अधिकार्‍यांना सामोरे जावे लागले. नळपाणी योजनेचे काम वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर तब्बल दोन तास मंदिरात बसून ठेवलेल्या अधिकारी वर्गाची अखेर सुटका झाली.
Exit mobile version