पाणी उपशामुळे पाणीटंचाईची भिंती

| कोर्लई | प्रतिनिधी |

यंदा कमी प्रमाणात पडलेला पाऊस, एल निनोचा प्रभाव याचा परिणाम भविष्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळातर्फे तुरुंबाडी पूलाच्या कामात मुरुड तालुक्यातील चिंचघर धरणातील पाणी उपशामुळे संभाव्य पाणीटंचाईची भिती व्यक्त केली जात असून, आगरदांडा ग्रामपंचायतीने पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.

आगरदांडा ग्रुप ग्रामपंचायतीतर्फे देण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे कि, आगरदांडा हद्दीत राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळातर्फे टोकेखार-तुरुंबावाडी या पुलावर काँक्रीटचे ब्लॉक बसविण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी लागणारे पाणी चिंचघर धरणातले वापरत आहात. सध्या महाराष्ट्रात पाण्याचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. असे असताना चिंचघर धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा केला जात आहे. या चिंचघर धरणावर आगरदांडा ग्रामपंचायतीसह सावली व राजपुरी या ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा होत आहे. यंदा पावसाळी हंगाम कमी असल्यामुळे चिंचघर धरण हे पातळीपेक्षा कमी भरले आहे. पुलाच्या कामासाठी पाण्याचा उपसा केल्याने स्थानिक ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी पुलाच्या कामासाठी लागणाऱ्या पाण्याच्या व्यवस्थेचा दुसरा पर्याय निवडावा. तरी देखील चिंचघर धरणातील पाण्याचा वापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, पत्रात म्हटले आहे. तसेच, या पत्राच्या प्रती मुरुड तहसीलदार व तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना देण्यात येणार असल्याचे आगरदंडा ग्रामपंचायतीतर्फे सांगण्यात आले आहे.

Exit mobile version