सुधाकर घारे प्रतिष्ठानतर्फे पाणीपुरवठा

| पनवेल | प्रतिनिधी |

उन्हाच्या झळांसोबत पाणी टंचाईच्या झळा दुर्गम भागात तीव्र झाल्या आहेत. यंदा कर्जत तालुक्यातील 25 गावांना आणि त्या गावांतर्गत येणाऱ्या वाड्यावस्त्यांमध्ये भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या टंचाईग्रस्त गावांना सुधाकर घारे प्रतिष्ठानने आधार दिला असून रविवारी (दि.14) गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची मोहीम सुरू केली आहे. याची सुरुवात खांडस ग्रामपंचायतीतील बांगरवाडी गावातून झाली.

मोहिमेअंतर्गत सात लाख 80 हजार लिटर पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट असून दरदिवशी 26 हजार लिटर पाणीपुरवठा केला जाणार आहे. तालुक्यातील खांडस, अभेरपाडा, पाथरज, नांदगाव, आळेमण,कळंब या मोठ्या ग्रामपंचायती मधील बांगरवाडी, धनीवाडी, पेठारवाडी, वडाचीवाडी, टेपावाडी, मेंगाळवाडी, पादिरवाडी, चाफेवाडी, काठेवाडी, बेलाचीवाडी, आंबेरपाडा, ताडवाडी, मोरेवाडी, धोत्रेवाडी, मोहपाडा, चिंबरेवाडी, दिवाळीवाडी, विठ्ठलवाडी, झुगरेवाडी, ओलमनगाव, बनाचीवाडी, बोरीचीवाडी, चाहुचीवाडी, गुडवनवाडी, नवसुचीवाडी या 25 गावांना महिनाभर पाणी पुरवठा होणार आहे. टँकरने पाणी पुरवठा मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी भगवान चंचे, अशोक भोपतराव, एकनाथ धुळे, रंजना धुळे, मंगल ऐनकर, मालू निरगुडा आदी उपस्थित होते.

कर्जत-खोपोली मतदारसंघात दुर्गम, डोंगराळ भाग जास्त आहे. येथील महिलांना पाण्यासाठी उन्हातान्हात पायपीट करावी लागते. त्यामुळे टँकरने महिनाभर पाणी उपलब्ध करून देणार असून येत्या काळात परिसरातील पाणी टंचाई निवारणासाठी काय उपाययोजना करण्यात येऊ शकतील, याबाबत सरकारकडे पाठपुरवठा करणार आहे.

सुधाकर घारे, माजी उपाध्यक्ष, रायगड जिल्हा परिषद
Exit mobile version