| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील पाषाणे ग्रामपंचायतीमधील आर्डे गावातील सध्याची नळपाणी योजना बंद पडली आहे. तर नवीन नळपाणी योजनेचे काम गेली तीन वर्षे सुरू आहे. त्यामुळे आर्डे गावामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. ग्रामस्थांना ग्रामपंचायतीकडून पाषाणे धरणातून उचलले जाणारे पाणी एक दिवसाआड सोडले जात आहे. मात्र, ते पाणी दररोज मिळावे आणि सध्याच्या उन्हाळ्याच्या दिवसात किमान अर्धा तास पाणी मिळावे अशी मागणी महिलांनी केली आहे.
आर्डे गावातील नळपाणी योजनेची विहीर ही उन्हाळ्यात कोरडी होत असल्याने या ठिकाणी फेब्रुवारी- मार्च महिन्यापासून पिण्याच्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. गावात असलेल्या विहिरीचे पाणी पिण्यासाठी आणण्यासाठी देखील काही शेकडो मीटर अंतर पायपीट येथील महिला वर्गाला करावी लागते. मात्र, जनावरे यांच्यासाठी लागणारे पाणी घरात वापरण्यास लागणारे पाणी यांची सोय नसल्याने पाषाणे ग्रामपंचायतीकडून येथील ग्रामस्थांसाठी पाषाणे लघुपाटबंधारे प्रकल्पातून पाणी पाईप लाईन टाकून आणले आहे. त्या पाण्याचा पुरवठा ग्रामपंचायतीकडून एक दिवसाआड 15 मिनिटे केला जातो. हा पाण्याचा पुरवठा जेमतेम होत असल्याने स्थानिक रहिवाशांना पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
नळपाणी योजनेचे पाणी डिसेंबर ते जानेवारीपर्यंत चालू असते. त्यानंतर पाण्याचा तुटवडा या गावांमध्ये जाणवत असतो. गावाची लोकसंख्या एकूण 1400 ते 1500 इतकी आहे, परंतु, या गावाला पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने या गावातील लोकांचे प्रचंड प्रमाणात हाल होताना पाहायला मिळत आहे. घरामध्ये पिण्यायोग्य पाणी आणण्यासाठी गावातील महिला विहिरीवर जात असतात. मात्र, त्यानंतर जे घरगुती किंवा कपडे धुण्यासाठी पाणी लागते हे पाणी ग्रामपंचायत येथे सोडते. मात्र, ते पाणी दिवसाआड सोडले जात असल्याने महिलांची पायपीट कायम आहे. दिवसाआड केवळ 15 मिनिटे पाणी सोडले जात असल्याने ग्रामस्थ हैराण आहेत. घरात वापरणाऱ्या पाण्याची टंचाई आल्याने या गावातील महिलांना नदीवर कपडे धुण्यासाठी जावे लागत आहे. कपडे धुण्यासाठी तीन ते चार किलोमीटर पायपीट करून पाषाण नदीवर जावे लागते. ग्रामपंचायतने दररोज किमान एक तास पाणी सोडावे अशी ग्रामस्थांची मागणी असल्याचे सचिन शेळके यांनी सांगितले. तर जलजीवन योजनेचे काम अनेक वर्षे रखडले असून ते लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी ग्रामस्थांची असून ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन पाषाणे लघुपाटबंधारे प्रकल्पातून आता दररोज पाणी सोडले जाईल असे आश्वासन ग्रामपंचायत अधिकारी केंद्रे यांनी दिले आहे.







