ममदापूर गावातील पाणीपुरवठा सुरळीत

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळजवळील ममदापूर या वेगाने नागरीकरण होत असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक ग्रामस्थांना नळाचे पाणी कमी दाबाने मिळत आहे. हर घर जल ही संकल्पना असलेली जलजीवन मिशनमधील नळपाणी योजना कार्यान्वित होऊनदेखील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी गावाच्या वेशीवर असलेल्या सिंटेक्स टाकीवरील नळाचे पाणी भरून डोक्यावर आणण्याची वेळ ममदापूर ग्रामस्थांवर आली आहे. पण, वीजपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे.

अडीच कोटींची नळपाणी योजना जलजीवन मिशनमधून ममदापूर ग्रामपंचायतीसाठी राबविण्यात येत आहे. या योजनेचे काम अनेक वर्षांनंतरदेखील अपूर्ण असून, जिल्हा परिषदेच्या नेरळ संकुल प्राधिकरणकडून अतिरिक्त निधी देण्यात आला तरीदेखील या योजनेचे काम अपूर्णच आहे. या नळपाणी योजनेचे काम पूर्ण होण्याआधी ग्रामपंचायत प्रशासन यांच्याकडून बिल्डर लॉबीसाठी नळजोडण्या दिल्या आहेत. त्यामुळे नळपाणी योजनेचे पाणी ग्रामस्थांच्या घरी असलेल्या नळाला येत नाही, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यात जलजीवन मिशनमध्ये हर घर जल ही संकल्पना असलेल्या या नळपाणी योजनेचे तीनतेरा वाजले असून, पूर्वी नेरळ ग्रामपंचायतीचे पाणी ग्रामस्थांना घरी मिळत होते. मात्र, ममदापूर ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र नळपाणी योजना तयार झाल्यावर मिळणारे पाणी हे घरोघरी पोहोचत नाही.

गेल्या काही दिवसापासून ममदापुर ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थांना एकवेळ पाणी मिळत नाही. नेरळ विद्या मंदिर परिसरात राहणार्‍या लोकांची तर अपुर्‍या पाणीपुरवठ्यामुळे त्रेधातिरपीट उडत आहे. कारण, या परिसरात असलेल्या गृहनिर्माण सोसायट्या यांच्याकडे पाण्याची टंचाई निर्माण झाली असून, येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी टँकर मागवावे लागत आहेत. ममदापूरसारख्या वेगाने वाढणार्‍या गावात निर्माण झाली असून, गेली चार वर्षे या नळपाणी योजनेचे काम सुरु असूनदेखील ममदापूर गावाच्या बाहेरील नवीन वसाहतामधील पाण्याचा जलकुंभ अद्याप तयारदेखील झालेला नाही. त्यामुळे आणखी काही महिने ममदापूर ग्रामपंचायतीमधील पाणीप्रश्‍न कायम राहण्याची शक्यता आहे.

जलजीवन मिशन योजनेचे काम प्रगतीपथावर आहे, त्यात वीजसमस्या आणि जुन्या जलवाहिन्या यामुळे पुरेशा दाबाने पाणी नाही.

चिंतामण लोहकरे, प्रशासक, ममदापूर ग्रामपंचायत
Exit mobile version