उन्हाळ्यातही प्यावे लागतेय टँकरचे पाणी; ममदापूर नागरीतील रहिवाशांच्या हाल
नेरळ | वार्ताहर |
नेरळ रेल्वे स्थानकातून जेमतेम 15 मिनिटांच्या अंतरावर असल्याने ममदापूरच्या नागरीकरण होत असलेल्या भागात मुंबईतील मध्यमवर्गीय लोकांनी घरे घेतली. मात्र, त्या नागरी वस्तीतील लोकांना ममदापूर ग्रामपंचायत नळाचे पाणी पोहचू शकली नाही.त्यामुळे येथील रहिवाशांना तेथे खोदलेल्या बोअरवेलचे पाणी सध्या प्यावे लागत आहे.दरम्यान, पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी त्रासलेल्या ममदापुर नागरी भागातील लोकांना उन्हाळ्यात ट्रँकरचे पाणी विकत घ्यावे लागते.
नेरळ ग्रामपंचायतला आणि कर्जत-कल्याण या राज्यमार्गाला लागून असलेल्या ममदापूर नागरी प्राधिकरणाच्या जागेत गेली सात वर्षात साधारण 200 इमारती उभ्या राहिल्या आहेत.जेव्हा या बिल्डिंग उभारण्यात आल्या त्यावेळी रेल्वे स्थानक जवळ आहे, म्हणून शेकडोंनी घरे घेतली ती नोकरी आणि व्यवसाय करण्यासाठी सहज जाता येईल म्हणून घरे घेतली. या भागात घरामध्ये 24 तास पाणी उपलब्ध आहे असे सांगण्यात आले. पण, गेली सात वर्षे झाली तरी या नागरिकांना हक्काचे पाणी काही मिळाले नाही. नेरळ ममदापुर संकुल प्राधिकरण मधील ममदापूर भागातील नागरी वसाहती ममदापूर ग्रामपंचायत हद्दीत आहेत. त्या भागातील इमारती यांना ममदापुर ग्रामपंचायतने पाणीपुरवठा करणे आवश्यक बाब आहे.नेरळ नळपाणी योजनेचे पाणी ममदापुर गावात येते,पण नेरळ ग्रामपंचायतला लागून असलेल्या या भागातील जनता आजही तहानलेली आहे.
ममदापूर ग्रामपंचायतीने प्रत्येक करदात्याला पिण्याचे पाणी दिले पाहिजे. नागरीकरण झाल्याने पाण्याची टंचाई जाणवू शकते. पण, आठ हजार लोकांसाठी बनवलेली भारत निर्माणची नळपाणी योजना फक्त गावातील लोक यांच्यासाठी आहे, हे काही उमजत नाही?
शावस्ती अभंगे, ग्रामपंचायत सदस्य
घर विकत घेताना बांधकाम व्यावसायिकाने 24 तास नळाचे पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. पण, आता आम्ही बोअरवेलचे पाणी पीत आहोत. ग्रामपंचायतला आम्ही कर भरतो, त्यामुळे त्यांनी स्वच्छ पाणी पुरवठा करायला हवा.
अहमद शहजाद आलम, स्थानिक रहिवासी
जनतेसाठी प्राधिकरणकडून 60 लाख रुपयांची तरतूद केली आहे. त्यातून दोन लाख लीटर पाण्याचे जलकुंभ उभारण्यात येणार असून, जलवाहिनी टाकण्यासाठी वितरण व्यवस्था यांच्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. हा निधी लघुपाटबंधारे विभागाच्या माध्यमातून खर्च करण्याची कार्यवाही प्राधिकरणने सुरू केली आहे.
आर.एस. देवांग, तांत्रिक अधिकारी, नेरळ ममदापूर संकुल प्राधिकरण