अंबा नदीची पाणी पातळी घटली, जॅकवेलमध्ये 6 फूट गाळ
। पाली /बेणसे । वार्ताहर।
अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली शहराला थेट अंबा नदीतून कोणतीही शुद्धीकरण प्रक्रिया न करता पाणीपुरवठा केला जातो. वर्षाचे 12 महिने पालीला पाणी समस्येने ग्रासले आहे. आता आंबा नदीची पाणी पातळी प्रचंड घटली आहे. तसेच जॅकवेलमध्ये तब्बल सहा फूट गाळ साचला आहे. हा गाळ काढण्यासाठी पालीतील पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.
उन्हाळ्याच्या तोंडावर अंबा नदीची पाणी पातळी घटल्याने पालीकरांना आगामी काळात पाणीपुरवठ्याचा विषय चिंतेचा झाला आहे. तसेच पाणी टंचाई उद्भवण्याची शक्यता आहे. शिवाय दोन दिवस पालीकरांचे पाण्यावाचून हालदेखील झाले आहेत. ज्यांच्याजवळ कुठेही विहीर किंवा बोअरवेल नाही त्यांना लांबून पाणी आणावे लागते. जॅकवेलमधील गाळ काढण्यासाठी दोन दिवस पाणीपुरवठा बंद करण्यात येईल या प्रकारच्या सूचना नगरपंचायतमार्फत नागरिकांना देण्यात आल्या आहेत. असे नगरसेवक अशिक मणियार यांनी सांगितले.
नदीच्या पाण्यात सध्या मोठ्या प्रमाणात हिरवळ तयार झाली आहे. शिवाय नदी पुलाचे काम सुरू असल्याने सिमेंटचे पाणी नदीत जाते. अंबा नदीच्या काठावर अनेक कंपन्या, फार्महाऊस, निवासी संकुल उभे राहिले आहेत. कंपन्यातील दुषित रसायनयुक्त पाणी आणि सांडपाणी थेट अंबा नदीच्या पात्रात सोडण्यात येते. तसेच नदीतून वाहून आलेले प्रदुषित व सांडपाणी पुढे वाहून न जाता येथेच साठून राहते. तसेच रसायन व सांडपाण्याबरोबरच कचरा आणि घाण देखील साठते. नदीवर महिला धुणीभांडी करतात. या सर्व प्रदूषणामुळे पाण्याला उग्र स्वरूपाची दुर्गंध येते, चवही खराब लागते. पाणी प्रदुषित झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
निर्माल्य प्लास्टिकच्या पिशव्यांमधून थेट अंबा नदीत टाकले जाते. या प्लास्टिकच्या पिशव्या जॅकवेलमध्ये जाऊन साठतात. त्यामुळे पाणीपुरवठा करण्यास अडथळा निर्माण होतो. तसेच हे टाकलेले निर्माल्य कुजल्याने देखील पाणी खराब होते. नगरपंचायत कर्मचारी नियमित जॅकवेलजवळील नदी पत्रातील निर्माल्य व निर्माल्याच्या पिशव्या काढून टाकतात. मात्र वारंवार निर्माल्य टाकले जात असल्यामुळे प्रश्न जटिल होतो.
अंबा नदीचे पाणी नळाद्वारे पुरविण्यात येते. वितरित होणार्या या पाण्यावर कोणतेही शुद्धीकरण व क्लोरीनेशनची प्रक्रिया न करता थेट पालीकरांना पाणी पुरविले जाते. अशा प्रकारे कित्येक वर्षे पालिकरांच्या आरोग्याशी खेळले जात आहे. पाली हे अष्टविनायक क्षेत्र आहे. येथे रोज हजारो भाविक येत असतात. पालीची स्थायी लोकसंख्या देखील पंधरा हजारहून अधिक आहे. अशा परिस्थितीत भाविक व नागरिकांना नाईलाजाने हे गढूळ व खराब पाणी प्यावे व वापरावे लागत आहे. आत्तापर्यंत येथील नळांतून चक्क जिवंत साप, खुबे, शिंपले, मासे आणि किडे अनेकवेळा बाहेर आले आहेत. गाळ, चिखल आणि शेवाळ येणे हे तर नेहमीचेच आहे.
पालीकरांसाठी जवळपास 27 कोटिंची शुद्धपाणी पुरवठा योजना मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. राजकीय हेवेदावे आणि लालफितीत ही योजना अडकल्यामुळे पालीकर अजुनही शुद्ध पाण्याच्या प्रतिक्षेत आहेत. सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी व तत्कालीन मंत्री यांनी शुद्धपाणी योजना कार्यान्वित करू असे आश्वासन दिले आहे. मात्र अजून काहीच झालेले नाही. प्रशासन व राजकारण्यांना पालीकरांचे हाल दिसत नाहीत. केवळ निवडणुकीपुरते आश्वासन दिले जाते असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
अंबा नदीच्या पाण्याची पातळी घटली आहे. तसेच जॅकवेलमध्ये मोठ्या प्रमाणात चिखल व गाळ साठला आहे. ते काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून काम पूर्ण झाल्यावर पालिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी दोन दिवस सहकार्य करावे. तसेच निर्माल्य प्लास्टिकच्या पिशव्यांमधून टाकू नये.
सचिन जवके, नगरसेवक, पाली नगरपंचायत