रेवस योजनेचा पाणी पुरवठा खंडित

15 दिवसातून एकदा नळाला येते पाणी, तेही तासभरच
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील रेवस योजनेचा पाणी पुरवठा नेहमीच चर्चेत असतो. रेवस योजनेचे नामकरण भारत निर्माण योजना झाले,पण त्यामुळे पाणी टंचाई काही दूर झाली नाही. 15 दिवसांत एक दिवस पाणी नळाला येते तेही केवळ तासभरच। त्यामुळे ग्रामस्थ पाण्यासाठी वणवण करीत आहेत.

रेवस पाणी पुरवठा योजन ही जीवन प्राधिकरण आणि एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने 1990 च्या सुरुवातीला गावागावात पोहचली. गावोगावी टाक्या उभ्या राहिल्या. नळ तोट्या बसल्या. ज्या गावात नैसर्गिक पाणी स्तोत्र मुबलक प्रमाणात होते त्यांना या योजनेच फारस कौतुक नव्हते. परंतु कालांतराने नैसर्गिक स्तोत्र आटले, विहिरी, ओस पडल्या. विंधन विहिरीचे पाणी देखील खारे झाले. त्यामुळे एमआयडीसीच्या पाण्या शिवाय पर्याय राहिला नाही.

दरम्यानच्या काळात लोकसंख्या वाढली, गावांचा विस्तार झाला. 24 तास येणारे पाणी काही तासांवर आणि पुढे काही दिवसानंतर मिळू लागले. आक्टोबर, नोव्हेंबर पर्यन्त पाऊस पडत असला तरी एप्रिल- मे महिन्यात भेडसावणारा दुष्काळ मात्र पाचवीला पूजल्या सारखा आहे. या वर्षी देखील रेवस योजनेवरील गावकऱ्यांना पाण्यासाठी एकतर भटकंती करावी लागते किंवा विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागते. विशेष म्हणजे विकतचे पाणी घेण्यावर गावकरी अधिक पसंती देत आहेत, त्यामुळे पाणी टंचाईची तीव्रता समोर येत नाही.

काही वर्षांपूर्वी पाणीटंचाई ची तीव्रता जिल्हापरिषद, ग्रामपंचायत कार्यालयावर निघणाऱ्या हंडा मोर्चातून स्पष्ट होत होती. पण गेली दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावा मुळे आणि विकतच्या मिळणाऱ्या पाण्यामुळे ही झळ कमी झाली आहे. पण अजून किती दिवस? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पावसाळ्यात देखील जिथे पाणी नळाला सुरळीत येत नाही, तिथे ऐन उन्हाळ्यात भेडसावणारी ही भीषण पाणी टंचाई प्रशासन कशी दूर करणार असा प्रश्न देखील विचारला जात आहे.

एकीकडे प्रशासन जलजीवन अंतर्गत घरोघरी पाणी देण्याचे स्वप्न दाखवीत आहे,पण स्तोत्र आटले तर काय? अनेक जलजीवन योजना सध्या बंद आहेत, त्या पैकी अलिबाग तालुक्यातील सारळ ग्रामपंचायतची एक योजना होय. विहीर आटल्याने पाणी बंद आहे, एमआयडीसी चे पाणी देखील 15 दिवसातून एक दिवस तेही अपुरे,त्यामुळे ग्रामस्थांनी तहान कशी भागवायची असा प्रश्न आहे.

Exit mobile version