ग्रामीण भागाला बसणार फटका
| रोहा | प्रतिनिधी |
मुख्य जल वाहिनी तपासणी, देखभाल व दुरुस्ती तसेच इतर आवश्यक तांत्रिक कामासाठी रोहा एमआयडीसी प्रशासनाने येथील सर्व कारखान्यांचा पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी म्हणून शुक्रवार दि.30 ऑक्टोबरपासून सलग दोन दिवस संपूर्ण एमआयडीसी परिसरात पाणी पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व कंपनीतील उत्पादन प्रक्रियेवर त्याचा गंभीर परिणाम झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्याचप्रमाणे या शट डाऊनचा फटका एमआयडीसीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या जवळपास असंख्य ग्रामपंचायत हद्दीतील 32 गाव, वाड्या आणि वस्त्यांना देखील बसणार आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर पाणी पुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांना विशेषतः महिला वर्गाला पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
अल-निनोच्या संभाव्य परिणामामुळे उपलब्ध जल साठ्याचे काट कसरीने व नियोजनबद्ध पद्धतीने करण्याबाबत कोलाड पाटबंधारे व रोहा एमआयडीसी प्रशासनाकडून लेखी पत्राद्वारे सूचना प्राप्त झाल्या आहेत. या अनुषंगाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ रोहा अंतर्गत शुक्रवारपासून दोन दिवसीय शट डाऊन घोषित करण्यात आला आहे. यादरम्यान पाणी पुरवठा करणारी जलवाहिनीची तपासणी, देखभाल व दुरुस्ती तसेच इतर आवश्यक तांत्रिक कामे पूर्ण करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात पाणी पुरवठा खंडित करण्यात आला आहे. या अनुषंगाने रोहे एमआयडीसीकडून दि.30ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून शनिवार दि.31 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजेपर्यंत एकूण 36 तास पाणी पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. तरी सर्व कारखानदार व ग्राम पंचायतींनी या सूचनेची नोंद घ्यावी, असे आवाहन एमआयडीसी महामंडळाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, या पाणी टंचाईमुळे बहुतांश गावकऱ्यांवर खाजगी टँकरदने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.






